सांगली : आटपाडीत २६ जून राेजी पाणी संघर्ष परिषद : वैभव नायकवडी | पुढारी

सांगली : आटपाडीत २६ जून राेजी पाणी संघर्ष परिषद : वैभव नायकवडी

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने कृष्णा खोऱ्यातील तेरा दुष्काळग्रस्त तालुक्यामधील आणि विशेषत: आटपाडी, सांगोला, मंगळवेढा व जत तालुक्यातील जनतेची २९ वी पाणी संघर्ष परिषद  रविवार (दि. २६ जून) रोजी दुपारी १.०० वाजता आटपाडी येथील जवळे मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती पाणी परिषदेचे निमंत्रक वैभव नागनाथ नायकवडी यांनी दिली.

यावेळी वैभव नायकवडी म्हणाले की, पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि भाई गणपतराव देशमुख यांचे प्रथम स्मृती वर्षांनिमित्त ही पाणी परिषद कृतज्ञता सोहळा साजरा करण्यात येणार आहे. पिढ्यानपिढ्या दुष्काळाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना कृष्णा खोऱ्यातील आपल्या हक्काचे पाणी मिळावे म्हणून डॉ. नागनाथ अण्णा यांनी ११ जुलै १९९३ रोजी पहिली पाणी परिषद घेतली. या घटनेला आता २९ वर्षे पूर्ण होत आहेत, असेही त्‍यांनी सांगितले.

आटपाडी तालुका केंद्रबिंदू मानून सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील जनतेची चळवळ अण्णांच्या नेतृत्वाखाली उभी राहिली. शेतमजूर, कष्टकरी शेतकरी संघटना, कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीच्या माध्यमातून चिवटपणे जनतेने लढा देऊन सरकारला कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करायला भाग पाडले. आता गेल्या सहा-सात वर्षांपासून आटपाडी आणि सांगोला तालुक्यात पाणी आले आहे. ऐतिहासिक स्वरूपाचा अभूतपूर्व असा हा लढा आहे, असेही ते म्‍हणाले.

लोकशाही मार्गाने चळवळीने जनतेच्या वतीने सह्यांचे निवेदन चावडीवर मोर्चे, तहसील कार्यालयावर मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, सिंचन भवनाला घेराव, शिवाजी पार्क ते मंत्रालय मोर्चा, आझाद मैदान ठिय्या आंदोलन व मानवी साखळी हे टप्पे पूर्ण केले. जनतेमध्ये पाण्यासाठी जागृती करून राज्यकर्त्यांना टेंभू, ताकारी, म्हैसाळ व सांगोला शाखा प्रकल्पासह दुष्काळी भागाला पाणी देणाऱ्या सर्व योजना पूर्ण करणे भाग पडले आहे. चळवळीच्या पायाभूत घोषणेनुसार प्रत्येकाच्या शेतात पाणी पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी बंदिस्त प्रयत्नांचे काम पूर्ण होण्याची गरज असल्‍याचे वैभव नायकवडी यांनी नमूद केले.

पाणी आले तरी विजबिलाचा ८१-१९ फॉर्म्युला अंमलात आणावा, प्रत्येक व्यक्तीमागे १००० घनमीटर पाणी द्यावे, सर्व योजनांच्या मुख्य आणि पोट कालव्यांची कामे पूर्ण करावीत. या व अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी ही चळवळ सुरू राहील, अशी ग्वाही नायकवडी यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये होणारी ही परिषद प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाई चंद्रकांत देशमुख माजी आमदार प्रा. शरद पाटील, प्रा.आर. एस. चोपडे, माजी आमदार राजेंद्र देशमुख, प्रा. बाळासाहेब नायकवडी, ॲड. सुभाष पाटील प्रा. शिवाजीराव काळुंगे, महादेव देशमुख, प्रा. दत्ताजी जाधव, प्रा. नानासाहेब लिगाडे, प्रा. विश्वंभर बाबर, प्रा. दादासाहेब ढेरे व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. ही परिषद यशस्वी करण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वैभव नायकवडी यांनी केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button