सांगली : महाराष्ट्रात रूजतोय ‘मातीरहित’ शेतीचा फंडा! | पुढारी

सांगली : महाराष्ट्रात रूजतोय ‘मातीरहित’ शेतीचा फंडा!

सांगली ; विवेक दाभोळे : पारंपरिक शेतीचा ढाचा बदलू लागला आहे. संपूर्णपणे नवी संकल्पना असलेल्या ‘अ‍ॅक्वापॉनिक्स’ अर्थात ‘मातीरहित शेती’ची संकल्पना महाराष्ट्रात रूजू लागली आहे. पहिल्या टप्प्यात पुणे, तळेगाव येथे ही शेती ‘एस्टॅब्लीश’ झाली आहे. मुंबई, ठाणे या महानगरांत तर यातून पिकवलेल्या भाजीपाला, फळांना, विदेशी भाज्यांना मोठी मागणी राहत आहे. नाशकातही ‘मातीरहित शेती’चा फंडा रूजू लागला आहे.

नांगरणी, खुरटणी, कुळवणी, सरी सोडणी, पेरणी, टोकणी ओणि भांगलण या पारंपरिक शेतीच्या स्वरुपाला छेद देणारी ‘अ‍ॅक्वापॉनिक्स’ ही नवी संकल्पना आहे. यात अन्नद्रव्यांच्या नैसर्गिक वृध्दी‘चक्राचा’ वापर करून झाडांच्या वाढीसाठी आवश्यक सर्व घटक पुरविले जातात. पाण्याचाही पुनर्वापर केला जातो. त्यामुळे कमी जागेत आणि कमीतकमी संसाधनांचा उपयोग करून शेतीतून जास्त उत्पन्न आणि नफा मिळवणे हा या मागील खरा हेतू! पुणे, मुंबईच कशाला आता अगदी सांगली, कोल्हापूरमध्ये देखील टेरेस फार्मिंग अर्थात गच्चीवरील शेती ही संकल्पना नवी राहिलेली नाही. अनेकांनी आपल्या अपार्टमेंटच्या टेरेसवर लहान प्रमाणात का असेना अशी शेती, भाजीपाला पिकवणे, लागवड सुरू केली आहे.

अ‍ॅक्वापॉनिक्स् मधून शक्य…

पीक वनस्पतींच्या, माशांच्या वाढीसाठी सर्वाधिक पोषक वातावरण मिळते, यातून कमी जागेत जास्त उत्पादन शक्य, पाणी आणि अन्नद्रव्याचा पुनर्वापर केल्याने कमी खर्च, वातावरण बदलाचा फटका फारसा बसत नाही. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांसाठी उपयुक्त.
अ‍ॅक्वापॉनिक्स शेतीची रचना उताराची दिशा, वार्‍याची दिशा, पाण्याची उपलब्धता तसेच संगोपनासाठी निवडण्यात आलेल्या माशांचा प्रकार, भाजीपिकांचे वाण यावर अवलंबून असतो. मासे सांभाळण्याची टाकी किवा तळे हे सिमेंट, प्लास्टिक किंवा जमिनीमध्ये खड्डा करून प्लास्टिक कागदाचे आवरण वापरून बनवले जाते.

टाकीची खोली दीड मीटरपेक्षा जास्त नसते. माशांच्या टाकीत योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी हवा मिसळण्याची रचना – माशांच्या वाढीसाठी पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजनचे प्रमाण खूप महत्त्वाचे असते. हे प्रमाण माशांच्या जातीनुसार बदणारे असले तरी ते साधारण 5 पीपीपेक्षा जास्त लागते. यातील गाळ विरहित पाणी झाडांच्या मुळांपाशी फिरवण्याची रचना असते. हे पाणी भाजीपाला लागवडीसाठी वापरतात.

क्वापॉनिक्स शेतीचे अर्थशास्त्र

क्वापॉनिक्स शेतीत मासे आणि झाडांच्या सहजीवनामुळे जास्त उत्पादन घेणे शक्य असल्याने कमी जागेत आणि कमी वेळेत जास्त फायदा मिळवता येऊ शकतो. मात्र साधारणत: दोन गुंठे शेतातून वर्षाला एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळवणे शक्य असते.

‘हायड्रोपोनिक’ शेती यशस्वी

कोरोनानंतर सर्वांमध्येच आरोग्याबाबत जागरूक आली आहे. पौष्टिक आणि शुद्ध अन्न, हिरव्या पालेभाज्या, फळे खाण्यास जास्त प्राधान्य दिले जात आहे. विशेषतः शहरांमध्ये, महानगरांमध्ये हा ट्रेंड वाढत आहे. अनेकजण आपल्या किचन गार्डनमध्ये, बाल्कनीमध्ये, अगदी टेरेसवर भाजीपाला पिकवू लागले आहेत. ठाणे येथील स्वप्नील शिर्के यांनी हायड्रोपोनिक्स फार्मची उभारणी केली. गणेशपुरी (जि. पालघर) येथे जवळपास 10 हजार चौरसफूट जागेत शिर्के यांनी नियंत्रित वातावरणात उच्च दर्जाच्या स्वच्छ आणि पोषक पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते.

‘हायड्रोपोनिक’ हा ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ मातीशिवाय फक्त पाण्याचा वापर करून अन्नधान्य उगवणे. हा शेतीचा एक आधुनिक प्रकार आहे. यामध्ये पाण्याचा आणि पोषक तत्वांचा वापर करून मातीविना लागवड केली जाते. अशा शेतीमध्ये हवामान नियंत्रित करून, तापमान 15-30 अंश आणि आर्द्रता 80-85 टक्के ठेवली जाते. पाण्याद्वारे वनस्पतींना पोषक तत्वे पुरवली जातात. यातून होणार्‍या भाजीपाल्यास मोठीच मागणी राहत असल्याचे शिर्के यांनी ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले.

Back to top button