निसर्गाचे संकेत शेतीसाठी लाभदायक : डख | पुढारी

निसर्गाचे संकेत शेतीसाठी लाभदायक : डख

भिलवडी : पुढारी वृत्तसेवा निर्सगाचे संकेत शेतीसाठी लाभदायक ठरतात. यासाठी थोडा अभ्यास व निरीक्षण करण्याची सवय असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केले. नांद्रे सोसायटीच्या वतीने आयोजित हवामान अंदाज व सोयाबीन निकावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

ते म्हणाले, हवामानात बदल होण्याआधी निसर्ग आपणास विविध माध्यमातून संकेत देतो. निर्सगातील काही बाबींचा निरीक्षणपूर्वक अभ्यास केल्यास आपणास हे लक्षात येते. दि. 2 मे ते दि. 10 मे दरम्यान वारे सुटले तर समजायचे जून महिन्यात लवकर पाऊस येणार आहे. पावसाच्या आगमनापूर्वी सरड्याचे डोके लाल झालेले दिसते. शेतात बिळाच्या बाहेर घोरपडी तोंड काढून बसतात. पाऊस चांगला पडणार असेल तर शेताच्या कुंपणावर रात्रीच्या वेळी काजवे मोठ्या प्रमाणात चमकताना दिसतात.

ते पुढे म्हणाले, कोणत्याही पिकाची लागण करण्यापूर्वी शेतजमीनीतील ओलाव्याचा अंदाज घेणे महत्त्वाचे ठरते. माती परीक्षण करून शक्यतो जमीनीच्या स्थितीनुसार विकसित केलेले बियाणे वापरावेत. याचा फायदा पिकाची उगवण चांगली होण्यास होतो. यावेळी नांद्रे सोसायटीचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील, उपाध्यक्ष मधुकर यादव – पाटील, महावीर पाटील, सचिव, सर्व संचालक, सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button