विटा : पुढारी वृत्तसेवा : वसंतदादा पाटील आणि संपतराव नाना माने हे दोघे मनाने एक होते. त्यांचे एवढ्या वर्षांचे संबंध पाहता दिवंगत वसंतदादांच्या वारसांनी माने घराण्याला ताकद द्यायला पाहिजे होती, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले. खानापूर येथे नगरसेवक राजेंद्र माने यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच राजकुमार माने, तिलोत्तमा माने, स्वीकृत नगरसेवक ॲड. विराज माने यांच्यासह नगरपंचायतच्या माने गटाच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी मंत्री पाटील (Jayant Patil) बोलत होते.
माजी आमदार सदाशिवराव पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, ॲड. बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील, वैभव पाटील, सुशांत देवकर, किसन जानकर, हणमंतराव देशमुख, शेखर माने, तानाजी पाटील, सचिन शिंदे, आनंदराव पाटील, राजू जानकर, महिला पदाधिकारी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील (Jayant Patil) म्हणाले की, १९८४ च्या दरम्यान संपतरावनाना मानेंच्या हस्ते माझा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला होता. आज त्याच नानांच्या वारसांचा माझ्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे. माने घराण्याने बदलत्या प्रवाहानुसार या पूर्वीच बदल करायला पाहिजे होता. आता माने कुटुंबाने पवारसाहेबांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे यापुढे माने घराण्याला चांगली ताकद देऊ. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे धोरण एकच आहे; पण त्यांचे सर्व निर्णय दिल्लीत होतात आणि आमचे निर्णय जाग्यावरच होतात. त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकतो, असेही ते म्हणाले.
आजचे राजकारण सोशल मीडियामुळे खराब होत आहे. राज्यात समन्यायी पाणी वाटपाची मागणी होत आहे. पण हे वाटप गावागावात पाणी आल्यावर करू. टेंभूपासून वंचित गावातील जवळपास ४ हजार ६ ७१ हेक्टर शेतीला पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील शेतीसाठी ८ टीएमसी अतिरिक्त पाणी उचलण्यात येईल. मतदारसंघातील सर्व गावांना पाणी देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माझ्या जलसंपदा खात्याच्या कारकिर्दीतच हे पाणी मिळणार आहे. कृष्णा नदीच्या पट्ट्यातील शेतीपेक्षाही हा भाग सुपीक होईल, खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होण्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही ना. पाटील यांनी सांगितले. (Jayant Patil)
माजी आमदार सदाशिवराव पाटील म्हणाले की, खानापूर तालुका संपतराव नानांचा तालुका म्हणून ओळखला जात होता. नानांनी उभ्या केलेल्या संस्था त्यांच्या पश्चात मोडीत काढल्या गेल्या. जयंत पाटील यांनी लक्ष घातल्यास त्या संस्था पुन्हा नानांच्या वारसांच्या ताब्यात देऊ. वसंतदादा पाटील यांच्या वारसांनी नानांच्या घराला न्याय देता आला नाही. आता राष्ट्रवादीत भवितव्य असून भविष्यात दगाफटका होणार नाही, याची काळजी घेऊन माने घराण्याच्या मागे ताकद उभी करु.
राजेंद्र माने म्हणाले की, आमची सत्ता नगरपंचायत निवडणुकीत थोडक्यात हुकली आहे. आम्हाला पुन्हा नगरपंचायतवर सत्ता आणायची आहे. मंत्री पाटील हे करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी ओळखले जातात. मात्र, आम्ही सावज टप्यात आणून देतो, तुम्ही करेक्ट कार्यक्रम करून नगर पंचायतीवर सत्ता काबिज करा. आमचा राष्ट्रवादीतला प्रवेश पहिला आणि शेवटचाच असेल. यापुढे आम्ही पक्ष बदलणार नाही. २०२४ ला सदाशिवराव पाटील यांना खानापूरचा आमदार करण्यासाठी जीवाचे रान करू, अशी ग्वाहीही माने यांनी दिली.
यावेळी माने गटाच्या आनंदराव जंगम, मारुती भगत, सुहास ठोंबरे, पुष्पलता माने, उमा देसाई यांच्यासह ९ पैकी ७ विद्यमान आणि माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी युवराज गोडसे, हर्षल तोडकर, विकास माने, शाहरुख पठाण, व्यंकट भगत, बद्रीनाथ गिड्ढे, अशोक भगत, माणिक भगत, रामभाऊ देसाई, सागर माने, रोहित भगत, शरद भगत, अभिजित टिंगरे, मनोज निचळ, अजय पवार, रामचंद्र भगत यांच्यासह घाटमाथ्यावरील कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचलंत का ?