निम्म्या कोल्हापूर जिल्ह्यात विधवा प्रथा बंद | पुढारी

निम्म्या कोल्हापूर जिल्ह्यात विधवा प्रथा बंद

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा राजर्षी शाहू छत्रपतींचा पुरोगामी वारसा सांगणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 25 पैकी 569 ग्रामपंचायतींनी ठराव करून विधवा प्रथा बंद केली आहे. राजर्षींच्या स्मृती शताब्दी वर्षात महिलांनी हे पुरोगामी पाऊल उचलले आहे.
शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे जिल्ह्यात पहिला विधवा प्रथाबंदीचा ठराव झाला. गावच्या महिलांनी पुढाकार घेऊन विधवांना सन्मानाने जगण्याची वाट खुली केली. आता केवळ जिल्ह्यात नव्हे, तर राज्यात विधवा प्रथाबंदीचे ठराव गावोगावी होत आहेत.

पतीच्या निधनानंतर कुंकू न पुसता मंगळसूत्र, बांगड्या, जोडवी हे सौभाग्यलंकार कायम ठेवत महिलेला समाजात सन्मानाने वागविण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला. कोल्हापूर जिल्ह्यात शिवराज्याभिषेकदिनी घेतलेल्या विशेष ग्रामसभेत 569 गावांत विधवा प्रथाबंदीचा ठराव करण्यात आला. उर्वरित गावांमध्ये दि. 15 जूनअखेर विधवा प्रथाबंदीचे ठराव करण्यात येणार आहेत. असे ठराव करण्यामध्ये भुदरगड तालुका आघाडीवर आहे. येथील 89 गावांनी, त्यापाठोपाठ करवीर तालुक्यातील 70 गावांनी विधवा प्रथाबंदीचे ठराव केले आहेत. विधवा प्रथाबंदीच्या ठरावासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.

ठराव केलेल्या गावांची तालुकानिहाय संख्या

आजरा 44, भुदरगड 89, चंदगड 58, गडहिंग्लज 42, गगनबावडा 5, हातकणंगले 44, कागल 45, करवीर 70, राधानगरी 32, शाहूवाडी 68, शिरेाळ 33, पन्हाळा 39.

जिल्ह्यातील 1,025 पैकी 569 गावांत विधवा प्रथाबंदीचे ठराव झाले आहेत. काही गावांच्या सभा तहकूब झाल्यामुळे तेथे ठराव होऊ शकले नाहीत. दि. 15 जूनअखेर जिल्ह्यातील उर्वरित 456 गावांमध्ये विधवा प्रथाबंदीचे ठराव होतील.
– संजयसिंह चव्हाण,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

ठराव केलेली प्रमुख गावे

करवीर ः उचगाव, मुडशिंगी, गांधीनगर, वळिवडे, पाचगाव.
कागल ः कापशी, सिद्धनेर्ली, सुळकूड, चिखली, केनवडे.
पन्हाळा ः काखे. हातकणंगले ः रूकडी, किणी, रेंदाळ, चंदूर, आळते, पुलाची शिरोली, वाठार तर्फ वडगाव, मिणचे.

 

Back to top button