आटपाडीजवळ अपघातात दोघांचा मृत्यू | पुढारी

आटपाडीजवळ अपघातात दोघांचा मृत्यू

आटपाडी : पुढारी वृत्तसेवा विभूतवाडी (ता. आटपाडी) येथे कराड – पंढरपूर महामार्गावर ट्रक आणि टेम्पो या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघे ठार झाले. एकजण गंभीर जखमी झाला आहे. निखील ऊर्फ गणेश नानासाहेब फडतरे (वय 19), महेश विजय फडतरे (29, दोघे रा. सुलतानवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत. निशांत बाबू फडतरे (19, रा. सुलतानावाडी) हा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, गुरुवारी रात्री कराड – पंढरपूर महामार्गावर विभूतवाडीच्या पश्चिमेला सातारा जिल्ह्याकडे जाणार्‍या रस्त्यावर ओढा आणि वळण रस्त्यावर हा अपघात झाला. कोरेगाव येथील शेतकरी कृषी यंत्र एजन्सीचा टेम्पो (एमएच 05 बीएच 3414) मालाची डिलिव्हरी करून परत निघाला होता. सातारा येथून दिघंचीकडे जाणार्‍या ट्रकची (एमएच 09 सीए 0540) आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली.

विभूतवाडीजवळ वळण रस्त्यावरील पुलाजवळ हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातग्रस्त वाहनांतून जखमींना ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढले. गंभीर जखमींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मायणी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना एकाचा मृत्यू झाला. दुसर्‍याचा आटपाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. निशांत फडतरे याच्यावर सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

विभूतवाडी अपघाताचे ठिकाण

विभूतवाडीमार्गे सातार्‍याकडे ओढा पात्रातील पुलावरून जाताना वळण रस्ता आहे. या ठिकाणी अनेकवेळा भीषण अपघातात अनेक लोकांचे बळी गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने अपघाताची तत्काळ दखल घ्यावी आणि वळण रस्ता सरळ करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

Back to top button