कडेगाव; रजाअली पिरजादे : दुष्काळी भागाला वरदान ठरणारी आशिया खंडातील सर्वात मोठी टेंभू सिंचन योजना भ्रष्टाचाराने पोखरली जात आहे. मुख्य कालव्यासह पोट कालव्यांच्या अस्तरीकरणचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सिमेंट काँक्रिटने झालेले अस्तरीकरणाच्या कामास तडे गेल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. दुष्काळी भागातील शेतकर्यांना पाणी मिळावे यासाठीचे शासनाने दिलेला कोट्यवधी रुपये पाण्यातच वाहून जात असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
सांगली व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील सुमारे 80 हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळण्यासाठी युती शासनाने काम हाती घेतले. कराड येथील कृष्णा नदीचे पाणी अडवून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यापर्यंत ते 213 गावांना पाणी देण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी घेतला. सुरुवातीला या योजनेचा 714 कोटी खर्च अपेक्षित होता. दुसर्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार आजरोजी योजना 4 हजार 88 कोटी 94 लाखांची झाली आहे. आतापर्यंत जवळपास 3 हजार 26 कोटी 66 लाखांचा निधी खर्च झाला. टेंभू योजना सुरू झाल्यापासून याला भ्रष्टाचाराची कीड लागली गेली आहे. जलद काम करण्यापेक्षा आपले खिसे गरम कसे करता येतील, याकडेच अधिकार्यांनी लक्ष दिले. पैशांच्या लोभापोटी अधिकार्यांनी या योजनेला चराऊ कुरण बनवले आहे. (क्रमशः)