कर्नाटकातील गुन्हेगारी टोळ्या सांगलीत | पुढारी

कर्नाटकातील गुन्हेगारी टोळ्या सांगलीत

सांगली ः सचिन लाड :  घरात घुसून व आठवडा बाजारात महागडे मोबाईल चोरी करण्यासाठी कर्नाटकातील सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या सांगलीत सक्रिय झाल्या आहेत. मोबाईल चोरला की त्याचा डिस्ल्पेसह अन्य पार्ट कर्नाटकमध्ये विकले जात असल्याची बाब ‘सायबर क्राईम ब्रॅच’च्या तपासातून पुढे आली आहे.

कर्नाटकातील या टोळ्यामधील गुन्हेगारांना पकडण्याचे ‘सायबर क्राईम’ विभागापुढे मोठे आव्हान झाले आहे. मोबाईल ही प्रत्येकाची गरजेची वस्तू झाली आहे. अगदी शाळेत जाणार्‍या मुलांकडेही मोबाईल आहे. महागडे मोबाईल खरेदीसाठी कितीही पैसे मोजले जात आहेत. एखादा मोबाईल चोरला की सहजपण तो विकला जायचा. ‘ईएमआय’ क्रमांकावरुन पोलिस गुन्हेगार शोध घेत होते. अनेकदा चोरीचे हे ‘कनेक्शन’ कर्नाटकच राहिले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षात मोबाईल चोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. दररोज चार ते पाच महागडे मोबाईल चोरीला जात आहेत. उघड्या घरात प्रवेश करुन हॉलमध्ये चार्जिंगला लावलेले मोबाईल लंपास केले जात आहेत. सांगलीत दररोज कुठे-ना-कुठे मोबाईल चोरीला गेल्याची नोंद पोलिसांच्या दप्तरी होत आहे. आठवडा बाजारातही ग्राहकांचे लक्ष विचलीत करुन खिशातून हातोहात मोबाईल पळविला जात आहे.

मोबाईल चोरला की तो लगेच बंद केला जातो. वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी सांगलीत ‘सायबर क्राईम’ विभाग सुरू करण्यात आला. या विभागाने चोरीच्या घटनांचा छडाही लावला, पण गेल्या दोन वर्षात छडा लावण्याचे प्रमाण अत्यंत कमी आले आहे. कर्नाटकातील टोळ्यामधील गुन्हेगार एखादा दिवस सांगलीत येऊन मोबाईल चोरुन पसार होता. ‘ईएमआय’ क्रमांकावर आपण सापडू नये, यासाठी त्यांनी आता मोबाईल चोरला की त्याचे पार्ट सुटे करुन विक्री करीत असल्याची धक्कादायक बाब ‘सायबर क्राईम’ विभागाच्या तपासातून पुढे आली आहे. एका मोबाईलच्या पार्ट विक्रीतून पाच ते सात हजार रुपये त्यांना मिळत आहेत. चोरीसाठी काही गुन्हेगार लहान मुलांचा वापर करीत आहेत. घर उघडे दिसले की, ते लहान मुलांना आत सोडून मोबाईल चोरीसाठी प्रवृत्त करतात. अनेकांनी लहान मुलांना मोबाईल चोरताना पकडले होते. मात्र ती लहान असल्याने त्यांना सोडून दिले. पोलिसांपर्यंत ही प्रकरणे गेलीच नाहीत.

मिरजेपर्यंत हे गुन्हेगार रेल्वेने येतात. तेथून मग सांगली आणि मिरज शहरात फिरुन मोबाईल चोरी करुन निघून जातात. रेल्वे पोलिसांनीही संशयित प्रवाशांची चौकशी करणे गरजेचे आहे. पोलिसांची ‘कोम्बिंग ऑपरेशन’ मोहीम थंडावली आहे. परिणामी गुन्हेगारांनी धुमाकूळ घालत मोबाईल चोरीची मालिकाच सुरू ठेवली आहे.

सांगली-कर्नाटक पोलिसांमध्ये समन्वय हवा!

कर्नाटकातील टोळ्यातील गुन्हेगारांना पकडता येऊ शकते. यासाठी सांगली व तेथील पोलिसांमध्ये समन्वय हवा. पूर्वी ‘बॉर्डर कॉन्फरन्स’ व्हायची. यातून गुन्ह्यांचा छडा लावण्यास मदत होत असे. मात्र गेल्या पाच-सहा वर्षात कॉन्फरन्स झाली नाही. समन्वयाअभावी गुन्हेगारांचे मात्र चांगलेच फावले आहे. नवीन गुन्हेगारच रेकॉर्डवर आले नाही.

Back to top button