सांगली : द. भा. जैन सभेच्या अधिवेशनाला प्रारंभ | पुढारी

सांगली : द. भा. जैन सभेच्या अधिवेशनाला प्रारंभ

सांगली : पुढारी वृत्तसेवा नांदणी पिठाचे प.पू. स्वस्तिश्री जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वीमीजी आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्याहस्ते ध्वजारोहण करून सभेच्या शंभराव्या महाअधिवेशनाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महास्वामीजींनी रावसाहेब पाटील यांना पुढील तीन वर्षांसाठी सभेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली.

गेल्या 123 वर्षांपासून कार्यरत असलेल्या दक्षिण भारत जैन सभेचे शंभरावे अधिवेशन सांगलीतील नेमीनाथनगर येथे पार पडत आहे. अधिवेशनाच्या कार्यस्थळाला दिवाणबहादूर अण्णासाहेब लठ्ठेनगर असे नाव देण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन त्यांचे नातू डॉ. भरत लठ्ठे यांच्याहस्ते करण्यात आले. सहकारमहर्षी स्व. शामराव पाटील-यड्रावकर शांतिपिठाचे उद्घाटन माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब जि. पाटील, कार्याध्यक्ष व माजी महापौर सुरेश पाटील, मुख्य महामंत्री डॉ. अजित पाटील, उपाध्यक्ष माधव डोर्ले, खजिनदार सागर वडगावे, सचिव प्रा. एन. डी. बिरनाळे, सहखजिनदार पा. पा. पाटील, मुंबईच्या आमदार भारती जैन, स्वाभीमानीचे संदीप राजोबा उपस्थित होते.

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून द. भा. जैन सभेच्या अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी नूतन अध्यक्ष रावसाहेब पाटील यांना नांदणी पिठाचे प. पू. स्वस्तिश्री जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींनी अध्यक्षपदाची शपथ दिली.
यावेळी बोलताना रावसाहेब पाटील म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून सभेचे काम उत्तम सुरू आहे. कोणतेही राजकारण न करता सभेमार्फत केवळ समाजाचे काम करण्यात येणार आहे. समाजातील कष्टकरी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती दिली जाते. त्याचा फंड काही वर्षापूर्वी 40 लाख होता. तो आता तीन कोटींवर पोहोचला आहे. आगामी तीन वर्षांत तो पाच कोटींपर्यंत नेण्याचा मानस आहे. त्यामुळे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना 25 ते 30 हजार रुपयापर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. द.भा. जैन सभेत एक लाख सभासद नोंदणीचे उद्दिष्ट ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, गरजूंना सढळ हाताने मदत करणारा जैन समाज आहे. ‘जीवो और जीने दो’ चा संदेश जैन समाजाने जगाला दिला आहे. जगात विचार आणि सत्तेत स्पर्धा सुरू आहे. परंतु, आता जगाला जैन शिकवणीची गरज आहे. समाजाची प्रगती हवी असल्यास शिक्षणाची प्रगती करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील मुलांना उत्तम दर्जाच्या शिक्षणाचे दरवाजे खुले करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. डॉ. भरत लठ्ठे म्हणाले, दिवाणबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे यांनी द.भा. सभेची सुरुवात केली होती. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अनेक मुले शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी लठ्ठे परिवाराकडून मदत करण्यात
येईल.

Back to top button