सांगली : राष्ट्रवादीच्या सचिवास बेदम मारहाण | पुढारी

सांगली : राष्ट्रवादीच्या सचिवास बेदम मारहाण

सांगली : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयीन सचिव मनोज भिसे यांना शनिवारी रात्री पाच जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

दरम्यान, ही मारहाण पक्षातीलच एका युवा पदाधिकार्‍याच्या लोकांनी केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील येथील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी संवाद यात्रेवेळीही हा प्रकार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निदर्शनास आला होता. त्यावेळी त्यांनी याची दखल घेतली होती. तरीसुद्धा हा वाद मिटलेला नाही.

पक्षातील एका युवा पदाधिकार्‍याचा काही दिवसांपूर्वी भिसे यांच्याबरोबर वाद झाला होता. त्यावेळी त्याने भिसे यांना धमकीही दिली होती. मात्र, भिसे यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत पक्षाचे काम सुरू ठेवले होते. शुक्रवारी रात्री एकाचा भिसे यांना फोन आला. त्याने भिसे यांना महावीर उद्यानाजवळ बोलावून घेतले. त्या ठिकाणी चार-पाच जण थांबले होते. त्यांनी आमच्या पदाधिकार्‍याच्या वाटेला गेलास तर तुझे खरे नाही, असे म्हणत बेदम मारहाण केली. त्यानंतर भिसे यांना विश्रामबाग परिसरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

याबाबत पक्षाचे सांगली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष प्रा. पद्ममाकर जगदाळे म्हणाले, घडलेला हा सर्व प्रकार चुकीचा आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याची सर्व माहिती देणार आहे.

बघण्यासाठी कोणी फिरकलेही नाही

मनोज भिसे हे गेल्या 19 वर्षांपासून पक्षासाठी काम करीत आहेत. त्यांच्यावर पडेल ती जबाबदारी ते पार पाडतात. मात्र त्यांना मारहाण झाल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी सुद्धा कोणी दवाखान्याकडे फिरकले नाही. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी खेद व्यक्त केला आहे.

Back to top button