सांगली : विद्राव्य खतांना भेसळीचा डोस | पुढारी

सांगली : विद्राव्य खतांना भेसळीचा डोस

सांगली : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारने अनुदानात कपात केल्यामुळे सर्व प्रकारच्या खतांच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे खतात भेसळीचे प्रमाण वाढले आहे. ही खते स्वस्त असल्याने आणि उधारीवर असल्याने शेतकरी याला बळी पडत आहेत. परंतुु त्यामुळे जमिनीबरोबर पिकांचेही नुकसान होत आहे.

फेकून देणारी खते परवडत नसल्याने तसेच त्यांचा उत्पादन वाढीत फारसा उपयोग होत नसल्याने सध्या ठिबक सिंचन व फवारणीद्वारे दिल्या जाणार्‍या खतांची मागणी वाढली आहे. परंतु बहुतांश शेतकर्‍यांना विद्राव्य खतांची पूर्ण माहिती नाही. त्यामुळे या खतांच्या नावाखाली भेसळयुक्‍त पावडर विक्री होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही खते नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम या मूलद्रव्यापासून तयार केली जातात. या मूलद्रव्यांचे इतर उपयुक्‍त घटकांबरोबर विविध प्रकारे मिश्रण करून विविध खते तयार केली जातात. हे घटक बाहेरच्या देशातून आयात करावे लागतात.

वाढत्या मागणीमुळे कधी-कधी खतांची कमतरता भासते. याचा गैरफायदा घेऊन काही कंपन्या भेसळयुक्‍त पावडर विद्राव्य खते म्हणून विकत आहेत. आयात केलेल्या खतांच्या पिशवीवर उत्पादकाचे, आयात करणार्‍या कंपनीचे नाव, बॅच नंबर, होलोग्राम असतो. विशेषत: होलोग्रामवर असणार्‍या क्रमांकावर मोबाईलवरून कॉल केल्यास संबधितांना मेसेज स्वरुपात लगेच उत्तर येते. असा रिप्लाय न आल्यास खतांचा बोगसपणा लक्षात येतो.

अनेक बनावट कंपन्या प्रशासनातील अधिकार्‍यांना मॅनेज करून असे बोगस क्रमांक मिळवितात आणि आकर्षक पिशवीमध्ये भेसळयुक्‍त पावडरची विद्राव्य खते म्हणून सर्रासपणे विक्री करतात. सामान्य शेतकरी गावातील कृषी सेवा केंद्रातून उसनवारी करून खते घेतात. त्यामुळे विक्रेता देईल ते खत शेतकर्‍यांना घ्यावे लागते. पण ही खते चांगल्या दर्जाची आहेत का, याची तपासणी कशी करावी, हे माहिती नसल्याने ते फसवणुकीला बळी पडतात. त्यासाठी घेतलेले खत नवी मुंबईतील तुर्भे येथील क्षेत्रीय उर्वरक प्रयोगशाळा येथे नमुना तपासणीसाठी दिल्याची खातरजमा करणे महत्त्वाचे आहे.

व्हिडिओ पहा : “नवनीत राणांची सिनेमात अधिक प्रगती होईल” – डॉ. नीलम गोऱ्हे

Back to top button