सांगली : शिक्षणाधिकारी, अधीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात | पुढारी

सांगली : शिक्षणाधिकारी, अधीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : पदवीधर वेतनश्रेणी मान्यता प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तीन शिक्षकांकडून एक लाख 70 हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी व अधीक्षकास रंगेहाथ पकडण्यात आले. शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे (वय 58, रा. लातूर, सध्या रा. कल्पतरू सोसायटी, विश्रामबाग) व अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे (41, अहिल्यानगर, कुपवाड) अशी त्यांची नावे आहेत.

पथकाने दोघांच्या घरावर छापे टाकून झडती घेतली. कांबळेच्या घरातून दहा लाख रुपयांची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सोनवणेच्या घरात तीन लाखांची रोकड सापडली. पथकाने ती जप्त केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता ही कारवाई केली. या कारवाईने जिल्हा परिषदेत खळबळ माजली आहे. कांबळे आणि सोनवणे यांना आज अटक करून न्यायालयापुढे उभा केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

तक्रारदार तीन शिक्षक आहेत. ते सांगली परिसरात राहतात. त्यांनी वेतनश्रेणी मिळविण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कांबळे याच्याकडे सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कांबळे व सोनवणे यांनी प्रत्येकी 60 हजार रुपयांप्रमाणे 1 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे दिले तरच प्रस्ताव मंजूर केले जातील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शिक्षकांनी 26 एप्रिल रोजी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. या विभागाच्या पथकाने तेंव्हापासून ते 2 मेपर्यंत चौकशी केली. त्यावेळी कांबळे व सोनवणे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. चर्चेअंती दोघांनी एक लाख 70 हजार रुपये तरी द्यावे लागतील, असे सांगितले.

पथकाने लावलेल्या सापळ्यानुसार शिक्षकांनी शुक्रवारी लाचेची रक्कम देतो, असे सांगितले. सोनवणे याने त्याच्या घराजवळ लाचेची रक्कम स्विकारताच पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. ही रक्कम कांबळे यांच्या सांगण्यावरुन घेतली आहे, रक्कम घेऊन कांबळेने घरी बोलाविले आहे, असेही त्याने सांगितले. पथकाने त्याला घेऊन कांबळेचे घर गाठले. तिथे सोनवणेने लाचेची रक्कम कांबळेच्या हातात दिली. पथकाने दोघांनाही तातडीने अटक केली. पहाटेपर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरु होते. त्यानंतर दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, हवालदार अविनाश सागर, प्रितम चौगुले, धनंजय खाडे, सलीम मकानदार, सीमा माने, संजय संकपाळ, भास्कर भोरे, संजय कलगुटगी, रविंद्र धुमाळ, राधीका माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

जिल्हा परिषदेत सापळा; पथकाला चकवा

सोनवणे याने शिक्षकांना प्रथम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. तत्पूर्वी, पथकाने तिथे सापळा लावला होता. पण, अचानक सोनवणेने त्याच्या अहिल्यानगर येथील घराजवळ शिक्षकांना बोलाविले. पथकाला चकवा मिळाला; पण पथक तातडीने अहिल्यानगरला रवाना झाले. अखेर रात्री उशिरा सोनवणे सापडला.

कांबळे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर

शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे हा सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर होता. पदभार स्वीकारल्यापासून तो वादग्रस्त ठरला आहे. त्याच्या घरात दहा लाखाची रोकड सापडली. ही रक्कम त्याने कोठून आणली, याबद्दल चौकशी सुरू असल्याचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी सांगितले. त्याच्या मालमत्तेचाही शोध घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

Back to top button