लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून बुजगावणी उभी : जयंत पाटील | पुढारी

लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून बुजगावणी उभी : जयंत पाटील

सांगली : पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील मोदी सरकार अपयशी ठरल्याने गोरगरीब जनता होरपळत आहे. मार्कस् म्हणायचा धर्म ही अफूची गोळी आहे. भाजपने सध्या देशाला ही अफूची गोळी देऊन मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी त्यांनी काही बुजगावणी उभी केली आहेत. जे स्वतः करून शकत नाहीत, ते त्यांच्याकडून करवून घेतले जात आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता आज येथे पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, मध्यवर्गीय, गरिबांना महागाईने घेरले आहे. संसार कसा करायचा हा या लोकांपुढे प्रश्न आहे. अशावेळी धर्म नावाची अफूची गोळी दिली जात आहे. काही काळ माणूस त्या गुंगीत राहिलं, मात्र रात्री झोपण्याआधी त्याला उद्याचा दिवस कसा काढायचा, याची चिंता वाटत आहे. सामान्यांचा भ्रमनिराश झाला आहे. त्यामुळे हे राजकीय भोंगे वाजवले जात आहेत.

ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने जे काही नियम घालून दिले आहेत, त्याचे पालन करून भोंगे लावायला हरकत असण्याचे कारण नाही. तो नियम जो कोणी मोडेल, तो कोणत्याही धर्माचा असेल, तर त्यावर कारवाई केली जाईल. मनसेने या विषयात दंगा करायचा ठरवला असेल, तर त्यांची राज्यभर एवढी ताकद नाही. त्यामुळे त्यांना अन्य पक्षातून मदत झाली, तर ते काही करू पाहतील. मात्र, राज्याची पोलीस यंत्रणा सक्षम आहे. ते त्यांचा बंदोबस्त करतील.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. आमच्या अनेकदा गप्पा होतात. मात्र त्यांनी कधी ते बाबरी मशीद पाडण्यासाठी गेले होते, असे सांगितले नाही. जर ते तेथे गेले होते तर कुठे उभे होते, त्यांना दगड वगैरे लागले का? त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता का?, की ते तेथून पळून आले होते, याची माहिती त्यांनी मला सहज गप्पा मारता मारता द्यावी, अशीही टोलेबाजी पाटील यांनी यावेळी केली.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजप नेत्यांना केंद्राकडून झटपट संरक्षण दिले जात आहे. त्याविषयी जयंत पाटील म्हणाले, मला पोलीस संरक्षण घेण्याची वेळ कधी आली नाही. या लोकांना कदाचित अतिरेक्यांपासून धोका असण्याची शक्यता आहे. त्यांना दाऊदचा फोन आला असू शकतो किंवा त्याचे कुणाशी काही गंभीर बिनसलेले असू शकते, असा टोला पाटील यांनी लगावला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button