सांगली : स्थानिक स्तरावर अधिकार गरजेचे ; पालकमंत्री जयंत पाटील | पुढारी

सांगली : स्थानिक स्तरावर अधिकार गरजेचे ; पालकमंत्री जयंत पाटील

सांगली : पुढारी वृत्तसेवा
जनतेला योग्य पद्धतीने व वेळेवर सेवा देण्यासाठी स्थानिक स्तरावरचे अधिकार स्थानिक संस्थांनाच देणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांचे बळकटीकरण गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. जिल्हा परिषद स्थापनेस 1 मे 2022 रोजी 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत हीरकमहोत्सव सोहळा झाला. यावेळी मंत्री पाटील बोलत होते. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी सुहास बाबर, देवराज पाटील उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, राजारामबापू पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांनी पंचायतराज व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम केले. येथील जिल्हा परिषद ही दिग्गज नेतृत्व तयारी करणारी शाळा आहे. या शाळेने महाराष्ट्राला नवनवीन नेतृत्व दिले आहे. आताही जिल्हा परिषद सांगलीच्या माध्यमातून जी नवीन पिढी तयार होत आहे तीही भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करेल. पुढील काळात कोरोनाचे संकट आले तरी आपण त्याचा ताकदीने मुकाबला करू.

शिवाजीराव नाईक म्हणाले, अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय राहिल्यास विकासाची कामे गुणवत्तापूर्ण होतात. जेवढे राज्य आणि केंद्र सरकार महत्वाचे आहे तेवढेच पंचायतराज यंत्रणाही महत्वाची आहे. आमदार बाबर म्हणाले, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून पंचायतराज व्यवस्थेची पाळेमुळे ग्रामीण भागात रूजली. जितेंद्र डुडी यांनी प्रास्ताविक केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी आभार मानले.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको : पाटील

पालकमंत्री पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नयेत, असा आमचा आग्रह आहे. त्यासाठी इम्पिरिकल डाटा संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button