सांगली मध्ये डॉक्टरची गळफासाने आत्महत्या | पुढारी

सांगली मध्ये डॉक्टरची गळफासाने आत्महत्या

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली येथील डॉ. दीपक रामकृष्ण राऊत (वय 55, रा. निर्मिती रेसिडेन्सी, चिंतामणीनगर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिंतामणीनगर येथील निर्मिती रेसिडेन्सीमध्ये प्लॅट क्रमांक 402 मध्ये डॉ. राऊत राहण्यास होते. ते विश्रामबाग येथील आदित्य रुग्णालयात सेवेत होते.

बुधवारी रात्री फ्लॅटमध्ये असलेल्या दोन बेडरुमपैकी एका बेडरुममध्ये त्यांनी छताच्या फॅनला पांढर्‍या रंगाच्या ओढणीने गळफास घेतला.

सकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

डॉ. राऊत यांच्या नातेवाईक वर्षा सचिन माने यांनी याबाबतची फिर्याद दिली. प्राथमिक तपासात आत्महत्येचे नेमके कारण समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, डॉ. राऊत यांनी लिहिलेली चिठ्ठी मिळून आली. मिळालेल्या चिठ्ठीत ताई, दादा, पिंकू मला माफ करा, मी स्वखुशीने जीवन संपवत आहे. याबाबत कोणालाही जबाबदार धरू नये, असे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.

तर पती- पत्नीत वारंवार वाद होत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. डॉ. राऊत यांच्या पत्नी या महापालिकेत नोकरीस आहेत.

डॉ. राऊत यांना पोलिसांनी समजवले होते

याबाबत पोलिसांनी सांगितले, मंगळवारी रात्री डॉ. राऊत हे ‘मी आत्महत्या करणार’, असे म्हणत होते. त्यासाठी त्यांनी दोरीही घेतली होती. ही माहिती त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिली.

जवळच पोलिस ठाणे असल्याने पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. डॉ. राऊत यांच्याकडील दोरी काढून घेतली. त्यांची समजूत काढून शांत केले होते. तरीसुद्धा त्यांनी रात्री आत्महत्या केल्याचे सकाळी उघड झाले.

Back to top button