सांगली : ‘घनकचरा’ धुमसू लागला; काँग्रेसची आज बैठक | पुढारी

सांगली : ‘घनकचरा’ धुमसू लागला; काँग्रेसची आज बैठक

सांगली : पुढारी वृत्तसेवा
घनकचरा प्रकल्पाच्या वादग्रस्त निविदेचा ठराव आता चांगलाच ‘धुमसू’ लागला आहे. भाजपची सत्ता असलेल्या स्थायी समितीने केलेल्या ठरावाला भाजपच्याच नेत्यांनी जोरदार विरोध केल्याने काँग्रेसनेही आता भूमिका निश्‍चित करण्यासाठी मंगळवारी नगरसेवकांची बैठक बोलवली आहे.
घनकचरा प्रकल्प कामाच्या निविदा रद्द करण्याबाबत स्थायी समितीने यापूर्वी दि. 24 ऑगस्ट 2020 रोजी केलेले ठराव रद्द करण्यात येत असल्याचा ठराव महानगरपालिकेच्या दि. 11 मार्च 2022 रोजीच्या स्थायी समिती सभेत झाला आहे. पक्षाची सत्ता असलेल्या स्थायी समितीने पक्षाच्या भूमिकेविरुद्ध ठराव केल्याने भाजप नेत्यांची मती गुंग झाली आहे. त्यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे. ठराव रद्द व्हावा. फेरनिविदा काढली जावी, यासाठी भाजपचे आंदोलन सुरू झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसनेही सर्व 21 नगरसेवकांची मंगळवारी बैठक बोलवली आहे. विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांच्या दालनात काँग्रेस नगरसेवकांची बैठक होणार आहे. या बैठकीत घनकचरा प्रकल्प निविदेबाबत चर्चा आणि काँग्रेसची भूमिका निश्‍चित होणार आहे.

काँग्रेसचा यापूर्वी विरोध; तरीही ठरावाला अनुमोदन

घनकचरा प्रकल्पाचा वादग्रस्त निविदेला यापूर्वी काँग्रेसने जोरदार विरोध केला होता. त्यानंतर भाजपनेही विरोधी भूमिका घेतली. मात्र दि. 11 मार्च 2022 च्या स्थायी समिती सभेतील घनकचरा प्रकल्पाच्या ठरावाला काँग्रेस सदस्यांनी अनुमोदन दिले आहे. काँग्रेसची या पूर्वीची भूमिका विचारात न घेता दिलेले अनुमोदन चर्चेस कारण ठरले आहे.

Back to top button