सांगली : आणखी 15 आरोग्य केंद्रे, 2 पॉलिक्लिनिक | पुढारी

सांगली : आणखी 15 आरोग्य केंद्रे, 2 पॉलिक्लिनिक

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिका क्षेत्रात आणखी 15 आरोग्य केंद्रे आणि 2 पॉलिक्लिनिक सुरू होणार आहेत. त्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातून 9.40 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तीन महिन्यात हे दवाखाने सुरू होतील, अशी माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली.

आयुक्त नितीन कापडणीस, सभागृह नेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती निरंजन आवटी, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, उपायुक्त राहुल रोकडे व चंद्रकांत आडके, सहायक आयुक्त नितीन शिंदे उपस्थित होते.

आयुक्त कापडणीस यांचा पाठपुरावा

महापौर सूर्यवंशी म्हणाले, महापालिका क्षेत्रात आरोग्य सेवा, सुविधा अधिक बळकट होत आहेत. आरोग्य, पॉलिक्लिनिक, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणी करून रुग्णसेवा प्रभावी करण्यात येत आहे. आयुक्त कापडणीस यांच्या पाठपुराव्यामुळे आणखी 15 आरोग्य केंद्रे व 2 पॉलिक्लिनिक मंजूर झाली आहेत. आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पॉलिक्लिनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, नर्सिंग स्टाफ असणार आहे. डॉक्टर, कर्मचार्‍यांचा पगारासाठी शासन अनुदान मिळणार आहे. महापालिकेच्या तिजोरीवर बोजा न पडता आरोग्य सेवा उपलब्ध होत आहे.

पाच मिनिटांच्या अंतरावर आरोग्य सेवा : कापडणीस

आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रात सध्या 10 आरोग्य केंद्रे आहेत. आणखी 15 आरोग्य केंद्रे आणि 2 पॉलिक्लिनिक तीन महिन्यात सुरू होत आहेत. महापालिका क्षेत्रात आता पाच मिनिटाच्या अंतरावर आरोग्य सेवा उपलब्ध होत आहे.

Back to top button