भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादीतच खरा सामना! | पुढारी

भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादीतच खरा सामना!

सांगली; खास प्रतिनिधी : राष्ट्रवादीची परिवार संवादयात्रा, आगामी विधानसभेच्या द‍ृष्टीने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरू केलेली मोर्चेबांधणी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही ‘गयारामांच्या घरवापसी’साठी सुरू केलेल्या हालचाली विचारात घेता भविष्यात जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचप्रमाणे येणार्‍या दिवसात जिल्ह्यातील भाजपाची उसनी सूजही उतरण्याची शक्यता आहे.

सांगली जिल्हा हा काँग्रेस परंपरागत बालेकिल्ला होता. पूर्वीपासून काँग्रेसंतर्गत गटबाजी असली तरी स्व. वसंतदादा पाटील यांच्या एकमुखी नेतृत्वामुळे काँग्रेसला कधी या अंतर्गत गटबाजीची फारशी झळ बसत नव्हती. मात्र काँग्रेसअंतर्गत गटबाजी शिखरावर पोहोचल्यामुळे 1995 साली जिल्ह्यात पहिल्यांदाच शिवाजीराव नाईक, स्व. संपतराव देशमुख, अजितराव घोरपडे आणि मधुकर कांबळे असे चार अपक्ष आमदार निवडून आले. याच चार आमदारांच्या पुढाकारामुळे भाजप-सेना युतीच्या सत्तेला अपक्ष आमदारांचा टेकू मिळाला. या अपक्ष आमदारांच्या माध्यमातून भाजपाला पहिल्यांदाच जिल्ह्याच्या राजकारणात शिरकाव करायची संधी मिळाली, अन्यथा त्यापूर्वी जिल्ह्यातील भाजपाचे अस्तित्व अण्णासाहेब डांगे आणि त्यांच्या विधान परिषद सदस्यत्वापुरते मर्यादित होते.

1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर तर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये सरळ उभी फूट पडली आणि खर्‍या अर्थाने जिल्ह्यात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशा संग्रामाला सुरूवात झाली. त्या काळात स्व. विष्णुअण्णा पाटील, स्व. आर. आर. पाटील, जयंत पाटील, शिवाजीराव नाईक, विलासराव शिंदे अशी मातब्बर मंडळी राष्ट्रवादीत डेरेदाखल झाल्यामुळे राष्ट्रवादीचे पारडे काहीसे जड वाटत होते. मात्र स्व. पतंगराव कदम, स्व. शिवाजीराव देशमुख, स्व. प्रकाशबापू पाटील, आ. मोहनराव कदम यांनी काँग्रेसनिष्ठ कार्यकर्त्यांची चांगली मोट बांधून राष्ट्रवादीच्या तोडीस तोड किंबहुना काकणभर सरस अशी ताकद जिल्ह्यात निर्माण करून दाखविली. कालांतराने स्व. मदन पाटील हेही काँगेसच्या मूळ प्रवाहात दाखल झाल्यामुळे काँग्रेस आणखीनच भक्कम होत गेली.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जिल्ह्यात काँग्रेस विरूध्द राष्ट्रवादी असाच सामना आहे, पण या सामन्यात आपणाला फारसे काही साध्य होत नाही, हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपलीच काही मंडळी काँग्रेस विरोधासाठी भाजपाला दत्तक देवून टाकली, तर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने काही ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात भाजपाला अंतर्गत सहकार्य केले. परिणामी सांगली आणि मिरजेसारखे हक्काचे बालेकिल्ले काँग्रेसच्या हातातून गेले.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचा इतिहास बघितला तर काँग्रेसविरोध हाच राष्ट्रवादीच्या राजकारणाचा पाया राहिलेला आहे आणि संधी मिळेल तिथे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसचा काटा काढायची संधी सोडलेली नाही. अगदी सध्या जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्याच्या राजकारणात हातात हात घालून असले तरी जिल्ह्याअंतर्गत राजकारणात काँग्रेसला शह देण्याची संधी राष्ट्रवादीकडून सोडली जात नाही. कडेगाव नगरपालिका निवडणूक आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत याची झलक बघायला मिळालेली आहे.

या सगळ्या बाबी विचारात घेता जिल्ह्याच्या राजकारणात भविष्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना काय अपेक्षित आहे, त्याचा अंदाज येण्यास हरकत नाही. स्व. वसंतदादा पाटील यांच्याप्रमाणे जिल्ह्याच्या राजकारणात आपले एकमुखी नेतृत्व प्रस्थापित करायची जयंत पाटील यांची महत्त्वाकांक्षा कधीही लपून राहिलेली नाही, पण त्यामध्ये पतंगराव कदम आणि मदन पाटील यांचा अडसर होता, तो आता दूर झाला आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीकडून भाजपात गेलेल्या त्यांच्याच गयारामांची घरवापसी घडवून आणली जाण्याची आणि जिल्ह्यावर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता निर्माण करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्या माध्यमातून सांगली, मिरजेसह जिल्ह्याच्या बहुतांश भागावत राष्ट्रवादीची हुकमत निर्माण करण्याचे प्रयत्न दिसून येताहेत.

आज काँग्रेसकडेही स्व. पतंगराव कदम, स्व. मदन पाटील यांच्यासारखे खमके नेतृत्व राहिलेले नाही. शिवाय आजही काँग्रेसंतर्गत गटबाजीही कायम आहे. विश्‍वजित कदम, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील ही आजतरी काँग्रेसची आशास्थाने आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या जिल्ह्यात काँग्रेसला मानणारा एक फार मोठा वर्ग आजही अस्तित्वात आहे, पण तो एकसंघ राहिलेला नाही, विखुरला गेला आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या गयारामांना तिथेही ‘शांतता’ लाभलेली दिसत नाही. हे गयारामही परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी आपला परंपरागत जनाधार सांभाळून पक्षांतर्गत गटबाजीला तिलांजली दिली तरी जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसला पुन्हा उभारी मिळू शकते. त्यासाठी विश्‍वजित कदम आणि विशाल पाटील यांनी काळाची पावले ओळखून वाटचाल करण्याची गरज आहे. हे ‘डबल व्ही’ इंजिन काँग्रेसला पुन्हा एकदा पूर्वीचे दिवस दाखवू शकते. कोल्हापूर उत्तरमधील विजयामुळे जिल्ह्यातील काँग्रेसला हुरूप आलाच आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे, त्याला विश्‍वजित-विशाल या ‘डबल इंजिन’ची जोड मिळाल्यास काँग्रेस सुसाट धावू शकते.

भाजपाचं उसनं अवसान ओसरण्याची चिन्हे!

आज जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार आहेत, पण या दोन आमदारांच्या विजयाला कुणाचा हातभार आहे, हे सर्वज्ञात आहे. पाच वर्षांपूर्वी भाजपाने आधी जिल्हा परिषद आणि नंतर महापालिकेची सत्ता काबीज केली, पण या सत्तेतील किती मोहरे मूळ काँग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत, त्याचा लेखाजोखा मांडला तर भाजपाचा बुडबुडा लक्षात येतो. काँग्रेस-राष्ट्रवादी अंतर्गत जिरवाजिरवीच्या राजकारणाचा तो परिपाक आहे. भविष्यात जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खुलेआम जंग झाली तर आज दिसत असलेले भाजपाचे उसने अवसान ओसरल्याशिवाय राहणार नाही.

Back to top button