सांगली : महिला पोलिसासह ११ जणांवर सावकारीचा गुन्हा | पुढारी

सांगली : महिला पोलिसासह ११ जणांवर सावकारीचा गुन्हा

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील गावभागातील सचिन सुरेश शिवजी (वय 32, रा. हरिपूर रोड) यांच्याकडून 4 लाख वसूल करण्यासाठी चाकूचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली. याबाबत शिवजी यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचारी कोमल धुमाळ, सराईत गुंड छोट्या ऊर्फ विक्रांत बाबर याच्यासह 11 जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी महिला पोलिस धुमाळ, छोट्या बाबर, रेखा बाबर, ओंकार बाबर, अभिजित कोकाटे, सोनम कोकाटे, वैशाली धुमाळ, अमित धुमाळ व इतर तीन अनोळखी या संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलिस कोमल धुमाळ या छोट्या बाबर याच्या नातलग आहेत.

दरम्यान पोलिसांनी सायंकाळी छोट्या ऊर्फ विक्रांत शंकर बाबर (रा. बसस्थानकाच्या पाठीमागे, बाबर चाळ) याला ताब्यात घेतले आहे. बाकी संशयित फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले, सचिन हे मार्च 2016 मध्ये छोट्या बाबर याच्या घरी भाड्याने रहात होते. त्याच्या घराचे भाडे त्यांनी वेळेवर दिले आहे. त्यावेळी सचिन व त्यांची आई यांनी त्यांच्या घरगुती अडचणीसाठी एक लाख रुपये बाबरकडून व्याजाने घेतले होते. ते ही पैसे सचिन यांनी व्याजासह परत केले आहेत. तरीही बाबर याने सचिन व त्यांच्या कुटुंबियांना पैशासाठी त्रास व धमकी देऊन दोन लाख सात हजार रुपये वसूल केले. त्यानंतरही आणखी पैशासाठी बाबरने तगादा लावला होता.

येथील शास्त्री चौकातून सचिन हे दुचाकीवरून जात असताना त्याला छोट्या बाबर व त्याच्या अनोळखी मित्रांनी गाडी अडवून शिवीगाळ केली. चाकूचा धाक दाखवत चार लाख रुपयांची मागणी केली. त्याशिवाय लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सचिन यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

गुंड छोट्या बाबरवर अनेक गुन्हे

सराईत गुंड छोट्या ऊर्फ विक्रांत बाबर याच्या विरोधात खुुनी हल्ला, लूटमार, मारामारी, गोळीबार, पोलिसांवर हल्ला करणे, टोळी तयार करून गुन्हे करणे आदी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपारही करण्यात आले होते. त्याशिवाय मोका कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी सुरू केल्याचे दिसत आहे.

Back to top button