मुख्यमंत्री ठाकरे-संभाजी भिडे यांच्यात बंद दाराआड चर्चा - पुढारी

मुख्यमंत्री ठाकरे-संभाजी भिडे यांच्यात बंद दाराआड चर्चा

सांगली ः पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर असणार्‍या मुख्यमंत्री ठाकरे यांची शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या सोबत बंद दाराआड चर्चा झाली. दरम्यान या भेटी बाबत दोघांनीही प्रतिक्रीया देण्यास टाळाटाळ केली. मात्र या भेटीचे अनेक अर्थ विश्लेषकांकडून लावले जात आहेत.

सांगली शहरासह पाच तालुक्यांत आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली.

भिलवडी, अंकलखोप, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, आयर्विन पूल आणि हरभट रोडवरील पूरपरिस्थितीची पाहणी करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.

आढावा बैठक आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि भिडे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातच बंद दाराआड सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले. भिडे यांना मुख्यमंत्री यांच्यासोबतच्या भेटीबद्दल विचारले असता त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

Back to top button