पुढारी कृषी प्रदर्शनास सांगलीत मोठा प्रतिसाद | पुढारी

पुढारी कृषी प्रदर्शनास सांगलीत मोठा प्रतिसाद

सांगली : पुढारी वृत्तसेवा दैनिक ‘पुढारी’च्या अ‍ॅग्री पंढरी कृषी प्रदर्शनात शेतकर्‍यांना विविध कंपन्यांकडून खरेदी व बुकिंगवर मोठी सवलत दिली जात आहे. त्याला शेतकर्‍यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाचा उद्या (मंगळवार) दि. 19 रोजी समारोप होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी प्रदर्शन पाहण्याची संधी दवडू नये, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे विजयनगर येथे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनाचे ऑरबीट गु्रप ऑफ कंपनीज् हे प्रायोजक आहेत. रॉनिक स्मार्ट ‘दि कुटे ग्रुप’ सहप्रायोजक, तर ‘केसरी टूर्स’ हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत.
सहकार व कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे शुक्रवारी उद्घाटन झाल्यानंतर हा ज्ञानयज्ञ पाहण्यासाठी शेतकर्‍यांनी अलोट गर्दी केली. पीक प्रात्यक्षिकासह कृषिविषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा खजिना पाहून शेतकरी भारावून गेले.

प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकर्‍यांचा ओघ वाढतच आहे. फळ, फुलांच्या फुललेल्या बागा पाहून भेट देणारे अनेकजण सेल्फी घेत आहेत. वांगी, गवारी, स्वीटकॉर्न, काकडी, कलिंगड, झुकेनी, ढबू, दोडका, घेवडा, बीन्स, कारले, मुळा, दुधी भोपळा, पावटा, झेंडू यांसह 50 पेक्षा अधिक पिकांच्या लागवडीची पाहणी शेतकरी मोठ्या कुतूहलाने करीत आहेत. ड्रोनद्वारे औषध फवारणीच्या प्रात्यक्षिकाची चौकसपणे विचारपूस करून हे तंत्रज्ञान आपल्या शेतात कितपत चालेल याचा अंदाज बहुतांश शेतकरी घेत आहेत. तसेच इतर स्टॉलनाही भेटी देऊन शेतकरी प्रत्येक नवीन तंत्रज्ञानाची माहिती सखोलपणे घेत आहेत. गृहोपयोगी वस्तूंची खरेदीही महिला मोठ्या उत्साहाने करीत आहेत. प्रदर्शनाच्या शेवटी असलेल्या खाद्ययात्रेतही खवय्यांची गर्दी होत आहे.

Back to top button