ऊस शेती आळशी असेल तर तुमच्या नातवांचे १२ साखर कारखाने कसे? राजू शेट्टींचा पवारांना सवाल | पुढारी

ऊस शेती आळशी असेल तर तुमच्या नातवांचे १२ साखर कारखाने कसे? राजू शेट्टींचा पवारांना सवाल

 पुढारी ऑनलाईन डेस्क : ऊस हे तसे आळशी माणसांचे पीक आहे. त्यामुळे फक्त ऊस घेण्याएवेजी थोडा कापूस, सोयाबीन आणि फळबागा अशी पीक पद्धती ठेवा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. यावर माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी फेसबूक पाेस्‍टच्‍या माध्‍यमातून टीकेचा आसूड ओढला अहे.ऊस शेती आळशी असेल तर तुमच्या नातवांचे १२ साखर कारखाने कसे? असा सवालही त्‍यांनी उपस्थित केला आहे. याचबरोबर ऊस शेती करताना शेतकऱ्याला किती काबाड कष्ट करावे लागते याचे गणित मांडत फेसबुक पोस्ट लिहत शरद पवार यांना उत्तर दिले आहे.

 शेट्टी यांनी पोस्टमध्ये लिहले आहे की, आळशी ऊस उत्पादकांची लक्षणे

१)जमिनीची नांगरट करून सऱ्या सोडणे.

२) वाकुरी मारणे.

३) हिरवळीचं खत घेऊन ताग अथवा  धैचा पेरणे.

४) तीन पाण्याच्या पाळ्या देऊन, हिरवळीचं खत गाडणे.

५)लागणीसाठी ऊस तोडणे, बी मांडणी आणि लागणी पुर्वीचा खताचा एक डोस टाकणे.

६)पाण्याबरोबर लागण करणे.

७)दोन वेळा आळवणी करणे.

८)तीन वेळा भांगलणे.

९)तीन वेळा रासायनिक खते, कीटकनाशक आणि फवारणी घेणे.

१०)बाळ भरणी करणे.

११)जेटा मोडणे, खताचे तीन डोस घेणे.

१२)भरणी करणे.

१३)दर पंधरा दिवसांनी रात्री अपरात्री उसाला पाणी देणे.

१४)उसाच्या कर्जासाठी बॅंक सोसायटी कडे हेलपाटे मारणे.

१५)उसाच्या नोंदीसाठी चिटबॉयला खुश करणे.

१६)उसाच्या तोडीसाठी कारखान्याचा संचालक ते चिटबॉय यांच्या हातापाया पडणे.

१७)चिटबॉय मुकादमाला धाब्यावर पर्यटनाला घेऊन जाणे.

१८)ऊस तुटल्यानंतर वेळेवर एफआरपीचे (FRP) पैसे मिळावेत म्हणून मोर्चे  काढणे.

१९) केसेस अंगावर घेणे.

२०) कोर्टाचे हेलपाटे मारणे.

आळशी ऊस उत्पादकाला वठणीवर आणण्यासाठी उपाय योजना 

१) या आळश्यांच्या जिवावर जिल्हा बँकेचे चेअरमन संचालक, कारखान्याचे संचालक चेअरमन यासारखी बांडगुळ पोसुन VSI सारखा पांढरा हत्ती सांभाळणे.

२) या आळशांनी पै-पै  (FRP) गोळा करुन उभारलेला सहकारी तत्वावरचा कारखाना मोडून खाणे.

३) एफआरपी चे शक्य तेवढे तुकडे करुन या आळशांना देशोधडीला लावणे.

४) कारखाना परिसरातील ऊस शिल्लक ठेवून कारखाना गाळप बंद करणे, काटा मारणे , उता-यात फेरफार करणे.

५) एकरकमी एफआरपी  (FRP) देणा-या कारखान्याच्या कार्यक्रमात जाऊन एफआरपी दोन टप्प्यात द्यावी लागेल. अशी खंत व्यक्त करणे.

पवार साहेब, या उपाय योजना आंमलात आणुन ऊस उत्पादकाला लवकरात लवकर धडा शिकवावा, अशी उपराेधिक टीकाही राजू शेट्टी यांनी केली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button