इस्लामपूर : वाळवा तालुक्यात चोरट्यांचा धुडगूस | पुढारी

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात चोरट्यांचा धुडगूस

इस्लामपूर : संदीप माने
वाळवा तालुक्यात काही महिन्यांपासून चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. घरफोड्या, मोबाईल चोरी, मोटारसायकल चोरी, वस्त्यांवरून जनावरांची चोरी आदीने नागरिक हैराण आहेत. दिवसेंदिवस चोर्‍यांचे प्रमाण वाढू लागले आहे. पोलिस यंत्रणा हतबल झाली असल्याचे चित्र आहे. वाढते चोर्‍यांचे प्रकार रोखणे पोलिसांसाठी आव्हानआहे.

इस्लामपूर शहरात गेल्या महिन्यात मध्यवस्तीमध्ये चोरट्यांनी दरोड्याचा प्रयत्न केला होता. ती टोळी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली होती. पोलिसांनी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत; तरीही नागरिकांना रात्रभर गस्त घालण्याची वेळ आहे. शहरातील काही उपनगरात कॅमेरे बसवलेले नाहीत. त्या परिसराची रेकी करून चोरटे घरफोडी करीत आहेत. बंद घरांना लक्ष केले जात असल्याचे समोर येत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातही चोरीचे प्रकार वाढले आहेत. चार दिवसांपूर्वी गौडवाडी, जुनेखेड येथे लाखो रुपयांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. शेतातील घरांना लक्ष केले जात आहे. वस्तीवरील जनावरे रातोरात वाहनात भरून नेली जात आहेत. चोरटे ही जनावरे सांगोला सारख्या लांबच्या बाजारात नेऊन विकत असल्याची चर्चा आहे. लाखो रुपयांची जनावरे चोरीला गेल्याने कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. विहिरीतील मोटर, विद्युत वायर चोरीला जात आहेत.

बसमधील प्रवासीसुद्धा सुरक्षित नाहीत. प्रवासादरम्यान मोबाईल, दागिने चोरीचे प्रमाण वाढले आहेत. इस्लामपुरात प्रवासादरम्यान महिलेचे सुमारे तीन लाखांचे दागिने लांबवल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. दररोज इस्लामपूर येथील बाजारांतून एक, दोन मोबाईल जात आहेत. आठवडी बाजरा दिवशी तर 5 ते 7 मोबाईल गेल्याच्या घटना घडत आहेत.

मोटारसायकल, चारचाकी चोरीचे रॅकेट…

वाळवा तालुक्यातून महिन्यात 10-15 मोटारसायकल चोरीला जात आहेत. गेल्या आठवड्यात ट्रॅक्टर चोरट्याला अटक करण्यात आली आहे. येथून चोरलेल्या कारचे कनेक्शन अहमदनगरपर्यंत होते. एका संशयिताला अटक करण्यात आली होती. मात्र, त्याचा तपास का थांबला, हे गुलदस्त्यात आहे.

Back to top button