पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुलीला स्थगिती : ऊर्जामंत्री | पुढारी

पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुलीला स्थगिती : ऊर्जामंत्री

सांगली: पुढारी वृत्तसेवा :सध्या राज्यातील पूरग्रस्तांची स्थिती बिकट आहे; पण महावितरणवर कर्जाचा डोंगर असल्याने त्यांचे सर्व वीज बिल माफ करणे शक्य नाही; मात्र राज्यातील पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुलीला स्थगिती देण्यात येत आहे, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगलीत शुक्रवारी केली. सांगली जिल्ह्यात महापुराने महावितरणचे सुमारे 35 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री राऊत यांनी शुक्रवारी पलूस तालुक्यातील भिलवडी, अंकलखोप, नागठाणे, मिरज तालुक्यातील दुधगाव, कवठेपिरान येथील पूरस्थिती आणि महावितरणच्या सबस्टेशनची पाहणी केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम,आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेटकर, कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री राऊत म्हणाले, महापुरामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील घरे, शेती आणि महावितरणच्या सबस्टेशनचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्याची मागणी होत आहे. मात्र वीज फुकटात तयार होत नाही. कोळसा आणि ऑईल विकत घ्यावे लागते. ते वेळेत घेतले तरच वीजनिर्मिती शक्य आहे. तसेच कर्मचार्‍यांचे पगारही वेळेवर द्यावे लागतात. मागील सरकारने वीज कंपन्यांवर 56 हजार कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. त्यामुळे सध्या उर्जा खात्यावर 70 हजार कोटी रुपयांची कर्ज घेण्याची वेळ आली आहे. मोठ्या कर्जामुळे आम्हालाही नोटिसा आल्या आहेत.

ते पुढे म्हणाले, पूरग्रस्त भागातील परिस्थिती भयावह असली तरी संपूर्ण वीज बिल माफ करणे शक्य नाही. मात्र राज्यातील पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुलीला स्थगिती देत ग्राहकांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यापुढे पूरग्रस्त भागात वीजबिले दिली जाणार नाहीत. तसेच सक्तीची वसुली थांबवण्याचा आदेश देण्यात येत आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, महापुरामध्ये सांगली जिल्ह्यात पाणी ओसरल्यानंतर नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. महापुराच्या काळात वायरमन अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. पाणी ओसरल्यानंतर अनेक सबस्टेशनची तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत केला. पुराने राज्यातील 170 गावांतील नऊ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी सात लाख 67 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरु करण्यात यश आले आहे.

अनेक गावांतील दुरुस्तीचे काम अद्यापही सुरू आहे. ज्या गावांचा वीज पुरवठा खंडित आहे, तोही पूर्ववत करण्याचा प्रयत्न महावितरणच्या कर्मचार्‍यांकडून सुरू आहे. त्यासाठी वायरमन कर्मचारी आणि तांत्रिक अधिकारी रात्रंदिवस झटत आहेत. 2019 ला असलेली पाण्याची पातळी गृहीत धरून सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर यांची उंची वाढविण्याबाबतचा विचार आहे. त्याबाबतचा आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत, असेही राऊत यांनी शेवटी सांगितले.

वीज फुकटात तयार होत नाही. कोळसा आणि ऑईल विकत घ्यावे लागते. ते वेळेत घेतले तरच वीजनिर्मिती शक्य आहे. कर्मचार्‍यांचे पगारही वेळेवर द्यावे लागतात.
– डॉ. नितीन राऊत, ऊर्जामंत्री

Back to top button