शिवाजीराव नाईक यांच्या राष्ट्रवादीस अधिकच बळकटी | पुढारी

शिवाजीराव नाईक यांच्या राष्ट्रवादीस अधिकच बळकटी

सांगली; विवेक दाभोळे : माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक रविवारी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. नाईक यांच्या या प्रवेशामुळे वाळवा – शिराळा तालुक्यातील राष्ट्रवादी अधिकच भक्कम होणार आहे. शिवाय नाईक यांच्या प्रदीर्घ राजकारणाच्या अनुभवाचा फायदा मिळून जिल्ह्यात देखील राष्ट्रवादीसाठी त्यांचे नेटवर्क फायद्याचे ठरणार आहे.

सन 1979 मध्ये सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक तोंडावर होती. तत्कालीन अध्यक्ष संपतराव माने आमदार झाले होते. त्यामुळे त्यांना जि. प. अध्यक्षपद सोडावे लागले होते. त्यावेळी जि. प. चा कार्यकाल तर अवघा सात ते आठ महिन्याचा राहिला होता. त्यामुळे कमी कालावधी मिळणार, पुन्हा क्लेम जाणार म्हणून त्यावेळी दिग्गज सदस्यांनी अध्यक्षपद नाकारले. सर्वात तरुण सदस्य म्हणून ‘ज्युनियर’ शिवाजीराव यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली. मात्र या संधीचे त्यांनी सोने केले.

त्याचवेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ग्रामीण विकासासाठी वीस कलमी कार्यक्रम आखला होता. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत अध्यक्ष शिवाजीराव नाईक यांच्या कार्यकौशल्यामुळे सांगली जिल्हा परिषद देशात प्रथम आली. पुढे विविध कारणांनी जि. प. च्या निवडणुका पुढे पुढे जात राहिल्या. सन 1991 मध्ये तर जि. प. अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला. मुदतवाढ आणि लाल दिवा मिळालेले ‘अध्यक्ष शिवाजीराव’ यांनी याचा पुरेपूर फायदा घेतला. फेबु्रवारी 1992 पर्यंत त्यांना अध्यक्षपदी काम करण्याची संधी लाभली.

या काळात जिल्ह्यातील एकही गाव असे राहिले नाही की जेथे ते पोहोचले नाहीत. मात्र पुढे राजकारणाचा बाजच बदलत गेला. बदलाचे वारे आले. यातूनच धक्कादायकरित्या ते सन 1995 मध्ये पहिल्यांदा अपक्ष आमदार झाले. युती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. या माध्यमातून त्यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघातील रस्ते अगदी टकाटक केले. मतदारसंघातील एकही गाव आणि एकही रस्ता असा राहिला नाही की जेथे रस्ता डांबरी झाला नाही. याच काळात त्यांनी यशवंत ग्लुकोज, यशवंत दूध संघ उभारला.

पुढे जून 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. जिल्ह्यात सर्वप्रथम शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. ते 1999 मध्ये राष्ट्रवादीतर्फे तर 2004 मध्ये काँग्रेसतर्फे आमदार झाले. सन 2009 मध्ये अपक्ष म्हणून ते लढले. मात्र त्यांचा पराभव झाला. सन 2014 मध्ये ते पुन्हा आमदारकीचा ‘चौकार’ मारताना भाजपातर्फे विधानसभेत पोहोचले. यावेळी त्यांना भाजपा श्रेष्ठींनी मंत्रीपद देण्याचा तसेच त्यांच्या अडचणीतील संस्थांना मदत देण्याचा शब्द दिला होता. मात्र भाजपातील गटबाजीचा, वरिष्ठ नेत्यांशी असलेल्या थेट संपर्काचा त्यांना फटका बसला. यातूनच त्यांची भाजपात ना मंत्रीपद आणि ना संस्थांना मदत अशी अवस्था झाली.

वर्तुळ पूर्ण….!

राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बेरजेच्या राजकारणातून पुन्हा एकदा शिराळ्याच्या ‘नागभूमी’त नवे समीकरण साकारत आहे. यातूनच शिवाजीराव नाईक हे पुन्हा राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. यातून त्यांच्या राजकीय वाटचालीचे एक वर्तुुळ पूर्ण होत आहे. भविष्यात हे राजकीय समिकरण चर्चेत राहणार आहे.

‘वाघ – नाग’
संघर्ष संपुष्टात
राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्यात सन 1999 पासून राजकीय संघर्ष सुरू होता. सन 2003-04 च्या दरम्यान तर ‘वाळव्याचा वाघ’, ‘शिराळ्याचा नाग’ यांच्यातील राजकीय संघर्ष टोकास पोहोचला होता. मात्र आता हा संघर्ष संपुष्टात आला आहे.

महाडिक, देशमुखांवर भाजपाची मदार
शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. यामुळे शिराळ्यात भाजपाची मदार ही जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, युवानेते सम्राट महाडिक यांच्यावर अवलंबून राहिली आहे.

Back to top button