सांगली : ‘लोकार्पण’ची गर्दी विरोधकांना त्यांची जागा दाखवेल - महापौर दिग्विजय सूर्यवंशी | पुढारी

सांगली : ‘लोकार्पण’ची गर्दी विरोधकांना त्यांची जागा दाखवेल - महापौर दिग्विजय सूर्यवंशी

सांगली : पुढारी वृत्तसेवा
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्याला दि. 2 एप्रिलरोजी सर्व समाज बांधवांची मोठी गर्दी होईल. ही गर्दी विरोधकांना त्यांची जागा दाखवून देईल, असे प्रतिपादन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पदाधिकारी, नगरसेवकांच्या बैठकीत केले.

महानगरपालिकेत वसंतदादा पाटील सभागृहात मंगळवारी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते व राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचे मंत्री, नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 2 एप्रिलरोजी होणार्‍या स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक आयोजित केली होती.महापौर दिग्विजय सूर्यवंशी, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, नगरसेवक शेडजी मोहिते, विष्णू माने, मनोज सरगर, मनगू सरगर, उत्तम साखळकर, संतोष पाटील, प्रशांत पाटील, फिरोज पठाण, मयुर पाटील, विजय घाडगे, शिवाजी दुर्वे, वर्षा निंबाळकर, शुभांगी साळुंखे, वहिदा नायकवडी, मालन हुलवान, स्वाती पारधी व नगरसेवक तसेच शिवसेनेचे शंभूराज काटकर, रुपेश मोकाशी व शिवसैनिक उपस्थित होते.

दि. 2 एप्रिलरोजी होणार्‍या स्मारक लोकार्पण सोहळ्याला सर्व समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहील. त्यादृष्टीने जिल्हाभर नियोजन सुरू आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महानगरपालिका क्षेत्रातूनही मोठ्या संख्येने सर्व समाजबांधव उपस्थित राहतील. प्रभागनिहाय जय्यत तयारी, नियोजनाबाबत चर्चा झाली. ज्येष्ठ नेते (स्व.) डॉ. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन आणि नाना-नानी पार्कचे उद्घाटनही दि. 2 एप्रिलरोजी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याहस्ते व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे मंत्री, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Back to top button