शिवाजी महाराजांच्या मूर्तीभोवती पोलीस बंदोबस्त अशोभनीय | पुढारी

शिवाजी महाराजांच्या मूर्तीभोवती पोलीस बंदोबस्त अशोभनीय

जत : पुढारी वृत्तसेवा

येथील शिवाजी पेठेतील पूर्वी असलेल्या पुतळ्याच्या ठिकाणीच नव्याने पुतळा उभारण्यास प्रशासनाचा विरोध का? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही बाब अशोभनीय आहे. आम्ही याबाबत प्रशासनाचा जाहीर निषेध करतो, असे पुतळा समितीचे अध्यक्ष माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगितले.

माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, शहरातील शिवाजी पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती अपघातामुळे हलविण्यात आल्याने त्याच ठिकाणी महाराजांची मूर्ती स्थापन करण्याचे जनतेने ठरविले आहे. त्याप्रमाणे कमिटीची स्थापना करण्यात आली. लोकवर्गणीमधून छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारुढ पुतळा जतच्याच मारूती सलगर या कलाकाराने तयार केला आहे.

गेल्या दि. 26 जानेवारीरोजी पूर्वीच्याच ठिकाणी शिवाजी चौकातील जत नगरपरिषदेने बांधलेल्या चबुतर्‍यावर मूर्तीची स्थापना करण्याचे ठरले होते. परंतु पोलिसांनी मूर्ती समिती सदस्यांना व कलाकार सलगर या सर्वांना नोटीस देऊन मूर्ती स्थापनेस विरोध केला आहे. तसेच सध्या सांगली येथे असलेल्या पुतळ्या भोवती पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. पुतळा न हलविण्याबाबत मूर्तीकारास तंबी दिली जात आहे. सध्या पुतळा बंदोबस्तात आहे.

पुतळा हलवू नये म्हणून सर्व शासन यंत्रणा सतर्क आहे. समिती सदस्यास व मूर्तीकारास नोटीस देऊन शासन गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती पोलिस बंदोबस्त ठेवून मूर्ती हलवू नये यासाठी मूर्तीला नजरबंद केले आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो.

जत नगरपरिषदेने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चबुतर्‍याचे काम पूर्ण केले आहे. त्याच चबुतर्‍यावर आम्ही पुतळा बसविणार आहोत. तो आच्छादित ठेवून त्यानंतर रितसर पुतळ्याचा अनावरण सोहळा होणार आहे. त्यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांना निमंत्रित करणार आहोत.

त्यासाठी शासनाने पुतळा हलविण्यास, वाहतूक करण्यास व तो उभारण्यास सहकार्य करावे. शासनाने बळाचा वापर करू नये. नोटिसा देऊन धमकावू नये. तसेच शांतताभंग होईल असे कोणतेही कृत्य शासनाकडून होऊ नये अशी अपेक्षा आहे. जनतेला व शिवप्रेमींना सहकार्य करावे. शांततेच्या मार्गाने पुतळा बसविण्यास शासनाकडून आमची सहकार्याची रास्त अपेक्षा आहे. यातून काही गैरप्रकार झाल्यास त्याला जिल्हा प्रशासन हे जबाबदार राहतील, असेही जगताप म्हणाले.

Back to top button