सांगली जिल्ह्यात संततधार; धरण क्षेत्रात मुसळधार

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यातील बहुतांश भागांत बुधवारी संततधार पावसाने हजेरी लावली. चांदोली, कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

सांगलीत सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. परिणामी रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 12.1 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 44.4 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस असा (मि.मी.मध्ये) ः मिरज 7.5, जत 13.7, खानापूर-विटा 2.3, वाळवा-इस्लामपूर 15, तासगाव 4.2, शिराळा 44.4, आटपाडी 2.3, कवठेमहांकाळ 4.6, पलूस 9.6, कडेगाव 5.6.

धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रात बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत झालेला पाऊस असा ः
कोयना : 109, महाबळेश्वर- : 140, नवजा : 148, चांदोली ः 68.

मुसळधार पावसाने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरण 54.49 टक्के (57.35 टीएमसी) तर चांदोली 75.87 (26.10 टीएमसी ) भरले आहे. 24 तासात कोयना धरणात 2.75 टीएमसी तर चांदोलीत 1 टीएमसी वाढ झाली आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणात 94.92 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

चांदोली धरणातून 1115 तर अलमट्टीतून 36 हजार 477 क्युसेक विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास कोयना, धोम, कण्हेर, चांदोली धरणातून विसर्ग वाढवण्यात येईल.सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणी पातळी सायंकाळी 10.9 फूट झाली होती.

आष्टा परिसरात जोरदार सरी

आष्टा : शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला. सर्वत्र पाणीच पाणी झाले होतेे. कारंदवाडी, मिरजवाडी, मर्दवाडी, बावची, गोटखिंडी, नागाव, ढवळी, पोखर्णीसह परिसरात जोरदार पाऊस झाला.

भिलवडी परिसरात संततधार

भिलवडी : पलूस तालुक्यातील भिलवडी, अंकलखोपसह परिसरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. वसगडे, माळवाडीसह अन्य गावातही चांगला पाऊस झाला.

इस्लामूपर ः शहरासह वाळवा तालुक्यात दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. पाझर तलावातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

कवठेमहांकाळ भागात रिमझिम
नागज ः कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्व भागात रिमझिम पाऊस झाला. नागज ढालगाव, चोरोची, आगळगाव, लंगरपेठ, इरळीसह परिसरात पावसाने हजेरी लावली.

कोकरूड-रेठरे बंधारा, येळापूर-समतानगर पूल पाण्याखाली
कोकरूड : गेल्या दोन दिवसांपासून शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागासह वारणा धरण परिसरात दमदार पाऊस सुरू आहे. परिणामी वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे. तसेच मेणी ओढ्यावर असणारा येळापूर-समतानगर पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

कोयना विभागात मुसळधार पाऊस
पाटण ः पुढारी वृत्तसेवा
कोयना धरणांतर्गत विभागात संततधार पाऊस पडत असल्याने धरणात प्रतिसेकंद सरासरी 33,914 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. या पाण्यामुळे गेल्या चोवीस तासांत धरणातील पाणीसाठ्यात 3.44 टीएमसीने, तर पाणी उंचीत 3.11 फुटांनी वाढ झाली आहे. कोयना धरण 57.35 टीएमसी भरले आहे. धरणाची 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे.

बुधवारी सायंकाळी पाच वाजता गेल्या चोवीस तासांत व एक जूनपासून आतापर्यंत झालेला एकूण पाऊस मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे – कोयना 94 (1547), नवजा 135 (2180), महाबळेश्वर 192 (2181) पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस सुरू झाल्याने नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत.

Back to top button