तासगाव : ‘कवठेमहांकाळ’ची सावली ‘तासगाव’वर पडणार? | पुढारी

तासगाव : ‘कवठेमहांकाळ’ची सावली ‘तासगाव’वर पडणार?

तासगाव : प्रमोद चव्हाण

कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये सर्व मातब्बरांना लढा देऊन स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व दाखवणार्‍या रोहित पाटील यांची भूमिका तासगावच्या बाबतीतही तेवढीच लढाई देणारी राहणार का, ते भाजपचा बालेकिल्‍ला सर करू शकणार का, असे प्रश्‍न आता तासगावकरांसमोर आहेत. कवठेमहांकाळच्या निकालाची सावली तासगाववर पडणार का, याची प्रतीक्षा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आहे.

तासगाव पालिका (स्व.) आर. आर. पाटील यांनी स्वतःचा बालेकिल्‍ला म्हणून नेहमीच ताब्यात ठेवली होती. मात्र त्यांच्या पश्चात अवघ्या चार महिन्यात खासदार पाटील यांनी हा बालेकिल्‍ला आपल्या ताब्यात घेतला. गेल्या सात वर्षांत खासदार पाटील गटाकडे अबाधित राहिलेला हा किल्‍ला यंदा कवठेमहांकाळच्या निकालानंतर राष्ट्रवादी जिंकू शकेल, अशी अशा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पल्‍लवीत झाल्या आहेत.
मात्र खासदार – आमदार गटात असलेल्या कथित छुप्या युतीच्या राजकारणामुळे तासगावचा विकास झालाच नाही. सत्ताधारी भाजपने केवळ विकासाची चर्चाच केली. राष्ट्रवादीला विरोधी भूमिका पार पाडता आली नाही. त्यामुळे तासगाव शहराच्या विकासाला सुरुवातच झाली नाही.

‘जैसे थे’

शहरात सध्या अनेक समस्या ‘जैसे थे’ असताना शेवटच्या टप्प्यात केवळ रस्त्यांवर मलमपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे 13 कोटींचा निधी रस्त्यावर खर्च झाला, की अन्यत्र मुरला असा सवाल विचारला जात आहे. भाजपच्या नगरसेवकांनी तासगावच्या विकासासाठीची पाच वर्षे काय केले, असा उघड सवाल आता नागरिक विचारत आहेत.

शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष

माजी उपमुख्यमंत्री (स्व.) आर. आर. पाटील यांच्या राजकीय वारसाला कवठेमहांकाळच्या जनतेने डोक्यावर घेतले. मात्र तासगाव शहर, तालुक्यात याच्या उलट चित्र आहे. यशवंत आणि तासगाव कारखान्यांच्या ऊसबिलप्रश्‍नी तालुक्याअनेकवेळा शेतकर्‍यांची आंदोलने झाली. सध्याही ती सुरू आहेत. मात्र युवानेते रोहित पाटील किंवा आमदार सुमन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांनी या आंदोलनाला भेट देणेही टाळले. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

कवठेमहांकाळ मधील भूमिकेबद्दल चर्चा

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीची चर्चा राज्यभरात चांगलीच झाली. कवठेमहांकाळमध्ये सगरे गट, अजितराव घोरपडे आणि गजानन कोठावळेे यांचा गट या तीनही गटांना नामोहरम करून राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यात रोहित पाटील यांना यश आले. मात्र हे करीत असताना खासदार पाटील यांचे चारपैकी तीन उमेदवार निवडून आले आहेत. शिवाय भाजपने शेवटच्या टप्प्यात प्रचारही फारसा केला नव्हता. त्यामुळे कवठेमहांकाळमधील भाजप नेत्यांच्या भूमिकेबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

पाहा व्हिडिओ: मी नथुरामच्या व्यक्तिरेखेचं समर्थन करत नाही | Dr.Amol Kolhe on Why I Killed Gandhi | Nathura

 

Back to top button