सांगली : प्लास्टिक वापराने रस्ते... महापालिकेचा पॅटर्न | पुढारी

सांगली : प्लास्टिक वापराने रस्ते... महापालिकेचा पॅटर्न

सांगली : उद्धव पाटील
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने रस्ते हॉटमिक्स डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर सुरू केला आहे. प्रमुख चार रस्त्यांच्या डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर केला आहे. प्लास्टिकचा वापर रस्त्यांच्या मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण ठरतो आहे. पर्यावरण संवर्धनातील ते एक महत्त्वाचे पाऊलही आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी रस्ते हॉटमिक्स डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर सुरू केल्यास जिल्ह्यात प्लास्टिक कचर्‍याची समस्याच शिल्लक राहणार नाही.

सांगली : वापरासाठी गोळा केलेले टाकावू प्लास्टिक.
सांगली : वापरासाठी गोळा केलेले टाकावू प्लास्टिक.

‘माझी वसुंधरा आणि आझादी का अमृतमहोत्सव’

‘माझी वसुंधरा आणि आझादी का अमृतमहोत्सव’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका अनेकविध उपक्रम राबवित आहे. पर्यावरण संवर्धन, पर्यावरण पूरक उपाययोजना राबविल्या जात आहेत. रस्ते डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर हा महापालिकेचा एक आगळावेगळा आणि हटके उपक्रम ठरत आहे. राज्य शासनानेही या उपक्रमाची दखल घेतली आहे. महापालिकेचे कौतुकही केले आहे.

सांगली : प्लास्टिकच्या वापरातून केलेला डांबरी रस्ता.
सांगली : प्लास्टिकच्या वापरातून केलेला डांबरी रस्ता.

रस्ते हॉटमिक्स डांबरीकरणात प्लास्टिक वापर

बेडग येथील महापालिकेच्या कचरा डेपोवर श्रेडिंग युनिट आहे. घंटागाडीतून आलेल्या कचर्‍यातील प्लास्टिक, कचरा वेचक महिलांकडून गोळा केलेले प्लास्टिक तसेच विविध समाजसेवी संस्थांनी गोळा केलेले प्लास्टिक या श्रेडिंग युनिटवर आणले जाते. येथे प्लास्टिकचे तुकडे केले जातात. प्लास्टिकचे हे तुकडे चार हॉटमिक्स प्लँटवर पुरवले जातात. रस्ते हॉटमिक्स डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर हा अतिशय महत्वपूर्ण उपक्रम आहे. माझी वसुंधरा अंतर्गत प्लास्टिक रिसायकल, रियुज आणि रिफ्युज याबाबत महापालिकेकडून प्रभावीपणे काम, प्रबोधन सुरू आहे, अशी माहिती समन्वयक डॉ. रविंद्र ताटे यांनी दिली.

श्रेडिंग युनिटवरील प्लास्टिक संपले

झुलेलाल चौक ते सिव्हिल हॉस्पिटल चौक, सिव्हिल हॉस्पिटल चौक ते शंभरफुटी रस्ता, कॉलेज कॉर्नर ते आपटा पोलिस चौकी, आपटा पोलिस चौकी ते काँग्रेस भवन तसेच सूतगिरणी ते कुपवाड या रस्ते हॉटमिक्स डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर केला आहे. श्रेडिंग मशीनवर तुकडे केलेले प्लास्टिक सध्या चार हॉटमिक्स प्लँटना पुरवले जात आहे. पण सध्या श्रेडिंग युनिटवर प्लास्टिकच शिल्लक नाही. प्लास्टिक गोळा करण्याचे काम सुरू आहे. हॉटमिक्स प्लँटवरील डांबराच्या मिश्रणाचे तापमान 165 अंश सेल्सिअस इतके असते. प्लास्किटचा विलय बिंदू 82 अंश सेल्सिअस आहे. डांबर व प्लास्टिकचे एकजीव मिश्रण रस्त्यांची मजबुती वाढविण्यासाठी महत्वपूर्ण ठरते आहे. प्लास्टिकमुक्तीतून पर्यावरण संवर्धनाचा हा पॅटर्न अन्य यंत्रणांनी राबविणे गरजेचे आहे. तसेच तो आदर्शवत देखील ठरत आहे.

सांगली : डांबरीकरणाच्या हॉटमिक्स प्लँटमध्ये खडीसोबत प्लास्टिकचे तुकडे टाकले जात आहेत.
सांगली : डांबरीकरणाच्या हॉटमिक्स प्लँटमध्ये खडीसोबत प्लास्टिकचे तुकडे टाकले जात आहेत.

कृतीतून नागरिकांना शिकवण : आयुक्‍त नितीन कापडणीस

महानगरपालिकेचे आयुक्‍त नितीन कापडणीस म्हणाले, पर्यावरणपूरक शहराकडे वाटचाल करण्यासाठी रस्ते कामात प्लास्टिकचा वापर हा महापालिकेचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. त्यातून शहर प्लास्टिकमुक्‍त होऊन रस्तेही दर्जेदार तयार होतील. नागरिकांना पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचे आवाहन करताना महापालिकेनेही स्वत: कृतीतून आदर्श घालून दिला आहे. रस्त्यांमध्ये प्लास्टिक वापर ही महापालिकेची स्वत:च्या कृतीतून नागरिकांना पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी दिलेली शिकवण आहे. ती राज्य आणि देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पथदर्शी आहे.

रस्त्याची मजबुती 35 टक्के वाढते : शहर अभियंता संजय देसाई

महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय देसाई म्हणाले, डांबराच्या वजनाच्या 4 ते 8 टक्के प्लास्टिक मिश्रणाचा वापर करता येऊ शकतो. सध्या महापालिका 5 टक्के प्लास्टिकचा वापर करीत आहे. प्लास्टिक वापरामुळे रस्त्याची मजबुती 35 टक्क्यांनी वाढते. वजन पेलण्याची क्षमता वाढते. पाणी मुरण्याची क्षमता नाहीशी होते. त्यामुळे रस्ते अधिक कालावधीसाठी चांगले राहतात. सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषदेनेही ठरवले तर जिल्ह्यात प्लास्टिकचा कचराच शिल्लक राहणार नाही. पर्यावरण संवर्धन होईल.

पाहा व्हिडिओ : कोल्हापूर महापालिकेचा सफाई कर्मचारी ठरला संकटातील प्राण्यांचा ‘दादा’

Back to top button