वाटेगावात बिबट्या, बछड्याचे दर्शन | पुढारी

वाटेगावात बिबट्या, बछड्याचे दर्शन

कासेगाव; पुढारी वृत्तसेवा : वाटेगाव (ता. वाळवा) येथील खोरी शिवारात ऊसतोड सुरू असताना मंगळवारी रात्री उशिरा बिबट्याची मादी व तिचा बछडा ऊसतोड मजुरांना दिसला. मजुरांची चाहूल लागताच तिथून बछड्याला सोडून त्याच्या आईने पळ काढला.

ऊसफड मालकाने माहिती वन विभागाला दिल्यानंतर प्राणीमित्र आणि वन विभागाने बछडा व त्याच्या आईची भेट घडवून आणली. नंतर ती मादी बछड्याला घेऊन गेल्याचा व्हिडीओ कॅमेराबद्ध झाला आहे.

काही महिन्यांपासून कासेगाव, वाटेगाव, भाटवाडी, शेणे, परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पाळीव जनावरांना ठार करण्याच्या
घटना झाल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी खोरी शिवारातील वाटेगाव सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष शिवाजी गावडे व माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ गावडे यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी मजुरांना बिबट्याची मादी व बछडा दिसला. गावडे यांनी याची माहिती वनविभागास दिली.

वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक अमोल साठे आणि वनमजूर खोरी शिवारात आले. तिथे त्यांना बछडा दिसला. त्यांनी मादी व बछड्याची भेट घडवून आणण्याची व्यवस्था करुन ट्रॅप कॅमेरे लावले. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मादी बछड्याला अलगद उचलून घेऊन गेली. त्याचेे चित्रीकरण ट्रॅप कॅमेरात चित्रबध्द झाले आहे. उपवनसंरक्षक विजय माने, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांचे मार्गदर्शनाने प्राणिमित्र गणेश निकम, विशाल गावडे, प्रकाश गावडे यांच्या मदतीने ही कामगिरी केली.

Back to top button