सांगली : जि. प. अध्यक्षांच्या बंगल्यात राडा, पदाधिकारी, सदस्यांत मारामारी | पुढारी

सांगली : जि. प. अध्यक्षांच्या बंगल्यात राडा, पदाधिकारी, सदस्यांत मारामारी

सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या येथील बंगल्यात जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पदाधिकारी यांच्यात सोमवारी रात्री जोरदार राडा झाला. कुंड्या, खुर्च्या यांची तोडफोड करीत एकमेकांच्या अंगावर जात हमरीतुमरी झाली. त्यात काही जणांना धक्काबुक्की आणि मारहाणही झाली. गाड्यांवरही दगडफेक करण्यात आली. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. दोन्ही गटांतील सदस्य विश्रामबाग पोलिस ठाण्यात थांबून होते. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता.

याबाबत घटनास्थळी आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जिल्हा परिषदेतील निधी वाटपावरून गेल्या काही दिवसांपासून सदस्य, पदाधिकारी यांच्यामध्ये वाद सुरू आहे. सोमवारी रात्री जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष, त्यांचे पती, दीर आणि काही सदस्य थांबलेले होते.

यावेळी भाजपचे काही पदाधिकारी, अपक्ष सदस्य अध्यक्षांच्या बंगल्यावर आले. त्यांच्यात निधी वाटपावरून पुन्हा जोरदार वादावादी झाली. वादावादीत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. शिवीगाळही करण्यात आली. या वादावादीतून काहींनी बंगल्यात असलेल्या कुंड्यांची तोडफोड केली. खुर्च्याही मोडल्या.त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे दीर राजू कोरे हे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी तत्काळ आले. त्याशिवाय विरोधी गटातील सदस्य पदाधिकारी यांनीसुद्धा विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेतली. परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती

राड्याच्या वेळी अध्यक्ष निघून गेल्या

जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे या सोमवारी रात्री बंगल्यावर होत्या. त्यावेळी बाहेरून काही सदस्य आल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. वादातून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार आणि मोडतोड हा सर्व प्रकार पाहून अध्यक्ष कोरे या तेथून तात्काळ निघून गेल्या.

कचरे, बालटे यांनी तोडफोड केली : राजू कोरे

जि.प. अध्यक्ष यांचे दीर राजू कोरे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत त्यांनी म्हटले आहे की, अध्यक्षांच्या बंगल्यावर रात्रीच्यावेळी जिल्हा परिषद अपक्ष सदस्य संभाजी कचरे, सदस्य अरुण बालटे, विद्यमान समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे, महिला बाल कल्याण सभापती सुनीता पवार आणि शिक्षण सभापती आशा पाटील यांचे पती यांनी अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या शासकीय निवासस्थानात घुसून निवासस्थानाची तोडफोड केली.

Back to top button