सांगली जिल्ह्यातील शाळा ३१ पर्यंत बंदच : जिल्हाधिकारी डॉ. चौधरी | पुढारी

सांगली जिल्ह्यातील शाळा ३१ पर्यंत बंदच : जिल्हाधिकारी डॉ. चौधरी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता, पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंदच ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.

ते म्हणाले, राज्यात शाळा सुरू करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु, प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती वेगवेगवळी आहे. त्यामुळे राज्य शासनाने दि. 20 जानेवारी रोजी परिपत्रक काढून ज्या-त्या जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा विचार करून स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावे, असे सांगितले होते.

सांगली
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी

सांगली जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात 23.99 इतका पॉझिटिव्हिटी दर आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत व कोरोना पॉझिटिव्हिटीच्या तपासणी दरामध्ये सातत्याने व वेगाने वाढ होत आहे. जिल्ह्यातील वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी तूर्त तरी दि. 31 जानेवारीपर्यंत पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग बंद ठेवण्यात येत आहेत.

परंतु, विविध शैक्षणिक बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, प्रशासकीय कामकाज, शिक्षकांनी अध्यापनाव्यतिरिक्त करावयाचे कामकाज, शालेय शिक्षण विभाग, कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, किंवा इतर प्राधिकरणांकडून राबविण्यात येणार्‍या उपक्रमांना परवानगी देण्यात आली आहे.

बंद ठेवण्यात आलेल्या पहिली ते बारावीच्या शाळा ऑनलाईन पध्दतीने सुरू ठेवण्याबाबत जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांना सूचना द्याव्यात. असेही जिल्हधिकारी चौधरी यांनी सांगितले.

अधिक वाचा :

 

Back to top button