कडेगाव निवडणूक वार्तापत्र : राष्ट्रवादीकडून काँग्रेसचा ‘करेक्ट कार्यक्रम’ | पुढारी

कडेगाव निवडणूक वार्तापत्र : राष्ट्रवादीकडून काँग्रेसचा ‘करेक्ट कार्यक्रम’

कडेगाव : रजाअली पिरजादे

कडेगाव तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. तर कडेगाव शहर हे (स्व.) डॉ पतंगराव कदम यांची राजकीय राजधानी म्हणून ओळखली जाते. डॉ. पतंगराव कदम यांनी तालुक्याचा व कडेगाव शहराचा सर्वांगीण विकास केला. परंतु नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने 11 विरुद्ध 5 अशी एकहाती सत्ता काबीज करीत काँग्रेसचे पानिपत केले.

डॉ. पतंगराव कदम यांची राजकीय राजधानी असलेल्या कडेगाव शहराला खिंडार पाडले. प्रथमच निवडणूक लढवणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा जिंकून नगरपंचायतीत प्रवेश केला. राष्ट्रवादीची स्वतंत्र लढण्याची भूमिका सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या पराभवासाठी प्रमुख कारण ठरली.

राष्ट्रवादीने काँग्रेसचा केलेला हा ‘करेक्ट’ कार्यक्रमच आहे, असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत काँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला तसेच अंतर्गत गटबाजीचाही मोठा फटका बसला. हा विजय भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांना म्हणजेच भाजपला मोठे बळ देणारा ठरला आहे.

निवडणूक अत्यंत चुरशीने झाली. काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली. या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते. नगरपंचायतीची ही दुसरी निवडणूक होती. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे दहा तर भाजपचे सात नगरसेवक निवडून आले होते.काँग्रेसची एकहाती सत्ता होती. यावेळी निवडणुकीत विशेष चुरस निर्माण झाली होती. यामध्ये काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी उडी घेतली होती. त्यामुळे कोणाची सत्ता येणार ही उत्सुकता होती. काँग्रेसला सत्ता टिकवण्यासाठी तर भाजपला सत्ता खेचून आणण्यासाठीच काम करायचे होते. त्यामध्ये भाजपने यश संपादन केले.

एकूण 17 पैकी 11 जागा भाजपाने जिंकत मागील निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढले. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपने चार जागा अधिक जिंकल्या तर काँग्रेसने मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत पाच जागा गमावल्या. नगरपंचायतीची ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक झाली. यात काँग्रेस, भाजप राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत रंगली होती. ही निवडणूक एकतर्फी होणार, असे सुरुवातीला वाटत होते. राष्ट्रवादीने प्रचारात आघाडी घेत निवडणुकीत रंगत आणली.

सत्ताधारी काँग्रेसच्या प्रचाराची सुत्रे कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, शांताराम कदम, डॉ. जितेश कदम यांच्या हातात होती. दुसरीकडे भाजपच्या प्रचाराची सूत्रे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याकडे तर राष्ट्रवादीच्या प्रचाराची सुत्रे आमदार अरुणण्णा लाड व शरद लाड यांच्या हातात होती.

काँग्रेसने प्रचार जोमात केला. मात्र पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि कुरघोड्यांचा मोठा फटका त्या पक्षाला बसला. पक्ष वाढीसाठी प्रथमच निवडणूक लढवणार्‍या राष्ट्रवादीने निवडणुकीपूर्वी भष्ट कारभाराविरोधात विरोधी पक्षाची भूमिका घेत आवाज उठवला. त्यानंतर संपूर्ण पॅनेल उभे केले. 17 पैकी 15 जागी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे केले. खर्‍या अर्थाने या ठिकाणी काँग्रेसच्या मतांची विभागणी झाली. त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला.

भाजपने या निवडणुकीत संयम बाळगला. प्रचार योग्य पद्धतीने केला तसेच मागील पाच वर्षांत सत्ताधारी काँग्रेस पक्षाने विकासकामे कमी पण मनमानी कारभार अधिक केल्याचा आरोप करीत लोकांचा विश्वास संपादन केला. दुसरीकडे काँग्रेसला केलेली विकासकामे पटवून देण्यात अपयश आले. याशिवाय स्थानिक गटबाजी, कुरघोड्यांचे राजकारण व राष्ट्रवादी कडून झालेला करेक्ट कार्यक्रम यामुळे काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवातून काँग्रेसला बोध घेत आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

Back to top button