नगरपंचायत निवडणूक वार्तापत्र : निवडणूक खानापूरची, चर्चा बेणापूरची! - पुढारी

नगरपंचायत निवडणूक वार्तापत्र : निवडणूक खानापूरची, चर्चा बेणापूरची!

विटा : विजय लाळे

खानापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधार्‍यांनी यश मिळविले. ही निवडणूक बेणापूरचे सुहास शिंदे, राजाभाऊ शिंदे आणि सचिन शिंदे या शिंदे घराण्यातील नेत्यांभोवतीच गाजली. मात्र आमदार अनिलराव बाबर यांची मजबूत साथ मिळाल्याने सुहास शिंदे हे सर्वांनाच वरचढ ठरले. तर जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी दबदबा असणारे खानापूरच्या माने घराण्याच्या राजकीय वर्चस्वाला चांगलाच धक्का बसला आहे.

खानापूरचे आमदार संपतरावनाना माने यांचा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा दबदबा होता. गेल्या काही वर्षात माने घराण्याच्या या राजकीय वर्चस्वाला घरघर लागली आहे. या निवडणुकीत तर माने घराण्यातील राजेंद्र माने आणि विराज माने हे उतरले होते. राजेंद्र माने यांना कडवी लढत द्यावी लागली तर विराज माने एकतर्फी पराभूत झाले. मुळातच माने यांना पॅनेल उभे करताना आमदार बाबर समर्थक राजाभाऊ शिंदे यांचा गट आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना मानणारा सचिन शिंदे यांचा गट बरोबर घ्यावा लागला.

सत्ताधारी गटाचे प्रमुख नेते सुहास शिंदे हे जसे बेणापूरचे तसेच विरोधी पॅनेलचे राजाभाऊ शिंदे आणि सचिन शिंदे हेही बेणापूरचेच. त्यामुळे या निवडणुकीत बेणापूरच्या शिंदे यांच्या नावाचा बोलबाला राहिला. सुहास शिंदे यांनी आमदार बाबर यांच्याबरोबर सुरुवातीपासून सुसंवाद ठेवला. त्यांच्याबरोबर विचारविनिमय करून हालचाली केल्या. एकेकाळी सुहास शिंदे यांचे राजकारण सांभाळणारे सचिन शिंदे हेही विरोधी पॅनेलमध्ये गेले. त्यामुळे आमदार बाबर आणि सुहास शिंदे यांच्या सर्व राजकीय क्लृप्त्या कळणारी मंडळी विरोेधी पॅनेलला मिळाल्याने अनपेक्षित चुरस निर्माण झाली.

सुहास शिंदे यांनी खानापुरातील बाबर समर्थकांना बरोबर घेऊन चांगली प्रचार यंत्रणा राबविली. राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार बाबर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या सभा झाल्या. विरोधी गटासाठी माजी आमदार सदाशिवराव पाटील, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या सभा झाल्या.

सुहास शिंदे एकहाती काम करीत होते. मात्र विरोधी गटाला मिळालेले यशही नाकारता येणार नाही. अखेर नगरपंचायतीत आमदार बाबर समर्थक आणि सुहास शिंदे समर्थकांनी झेंडा फडकावला. योग्य नियोजन, पाच वर्षातील काम, लोकांशी संपर्क आणि विनम्रपणा हा खानापूर घाटमाथ्याचे नेते सुहास शिंदे यांच्या जमेचा ठरला.

निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून आमदार बाबर आणि सुहास शिंदे गट एकत्र येणार हे स्पष्ट होते. विरोधी गटाचे नेतृत्व साहजिकच माने घराण्याने केले. ही निवडणूक इतकी चुरशीची झाली की माने घराण्याने राजेंद्र माने आणि विराज माने असे दोन मोहरे या निवडणुकीत उतरवले होते. एका बाजूस आमदार गट आणि सुहास शिंदे गट एकत्र आले तर त्याचवेळी आमदार बाबर गटाचे राजाभाऊ शिंदे, अनिल शिंदे आणि माजी आमदार पाटील गटाचे नेते आणि पूर्वाश्रमीचे सुहास शिंदे गटाचे समर्थक सचिन शिंदे माने गटास मिळाले. आमदार बाबर आणि सुहास शिंदे यांच्या जिंकण्याच्या क्लृप्त्या माहिती असणार्‍यांनी निकालात चुणूक दाखवून दिली.

Back to top button