खानापूर : पडळकरांना भोपळाही फोडता आला नाही, सगळ्या उमेदवारांना मिळून १०५ मते ! - पुढारी

खानापूर : पडळकरांना भोपळाही फोडता आला नाही, सगळ्या उमेदवारांना मिळून १०५ मते !

विटा : विजय लाळे

खानापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालात अपेक्षेप्रमाणे भाजपला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे भाजपचे प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ‘व्यक्तिगत करिष्म्याचा’ त्यांच्या होम ग्राऊंडवरच पराभव झाल्याचे बोलले जात आहे.

खानापूर नगरपंचायतीच्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रीय काँग्रेस या तीन प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या चिन्हांवर निवडणूक लढवली. काँग्रेसचे नेते सुहास शिंदे यांचा गटाने, शिवसेनेच्या पांडुरंग डोंगरे, लालासाहेब पाटील यांच्या गटाशी युती केली. हे दोन्ही पक्ष आपाप ल्या चिन्हासह निवडणुकीच्या रिंगणात आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन शिंदे, शिवसेने चे राजाभाऊ शिंदे आणि अनिल शिंदे यांचे गट जनता आघाडीच्या वतीने निवडणूक लढवत आहेत.

तसेच भाजप प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी आपल्या पक्षाच्यावतीने प्रथमच यावेळी १७ पैकी १६ जागांवर उमेदवार उभा करून निवडणुकीत रंगत आणली होती. खानापूर नगर पंचायतीची निवडणूक जाहीर होताच भाजपच्यावतीने आपण संपूर्ण पॅनल टाकू अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा आमदार पडळकर यांनी केली होती. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अर्ज भरेपर्यंत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या व्यक्‍तिगत करिष्म्यावर या निवडणुकीत काही चमत्कार घडवेल अशी अपेक्षा राजकीय जाणकार व्यक्त करीत होते.

तशा पद्धतीने आमदार पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर शहराच्या प्रत्येक प्रभागांमध्ये बैठका घेत जोरदार वातावरण निर्मितीही केली होती. त्यानंतर प्रत्यक्ष अर्ज भरेपर्यंत पडळकर बंधुंनी सर्व उमेदवारांच्या शिडात जणू आपण या निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहोत अशी जबरदस्त हवा भरली. सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना (इथे काँग्रेस,शिवसेनाआणि राष्ट्रवादीला) जणू खानापूरातून हुसकून लावणार अशा थाटाची नेहमीच्या स्टाईलने भाषण बाजीही केली.

खानापुरात नगरपंचायतीच्या निमित्ताने आपण प्रचारासाठी भाजपचे बडे नेते आणू अशी हूल उठवून देण्यातही आमदार पडळकर आणि स्थानिक भाजपाचे नेते यशस्वी झाले. परंतु प्रत्यक्ष मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतसे मात्र उमेदवारांना वाऱ्यावर सोडले गेले. निवडणुकीसाठी उभे केलेल्या उमेदवारांनी अनेक वेळा फोन करून ही केवळ शाब्दिक कसरती करून आमदार पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी वेळ मारून नेली असे आता भाजपा कार्यकर्तेच बोलत आहेत.

प्रत्यक्ष निवडणूक निकालाची आकडेवारी पाहिली तर, उभारलेल्या सगळ्या उमेदवारांना एकूण मिळून १०५ मते मिळाली आहेत. त्यात प्रभागवार पहिले असता प्रभाग क्रमांक १,४,५,७,८, १०, १२,१३,१५ या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना दुहेरी आकडा सुद्धा गाठता आलेला नाही. नाही म्हणायला ११ आणि ६ या प्रभागांमध्ये त्यांना दोन अंकी आकडा गाठता आला आहे.

मात्र एकूणच विचार करता ज्या खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार गोपीचंद पडळकर रहातात त्या मतदार संघातील एकमेव असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाला भोपळाही फोडता आला नाही याचाच दुसरा अर्थ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या व्यक्तिगत करिष्म्याचा हा होम ग्राऊंडवर झालेला पराभवच मानला जात आहे.

Back to top button