उच्चभ्रू लोकांकडून सावकारी जोमात | पुढारी

उच्चभ्रू लोकांकडून सावकारी जोमात

सांगली : शशिकांत शिंदे : सावकारी विरोधात पोलिसांची जोरदार कारवाई सुरू आहे. तरीसुद्धा चोरीछुपे सावकारी सुरू आहे. सावकारी करणारे कवठेपिरान येथील तीन व्यावसायिक आणि वाळवा येथील डॉक्टर दांपत्यावर कारवाई झाली आहे. यातूनच आता सावकारीत उच्चभ्रू मंडळींदेखील गंतुले असल्याचे पुढे आले आहे.

दोन वर्षांपासून सुरू असलेला कोरोनासंसर्ग, सलग दुसर्‍या वर्षी महापूर, शेतकर्‍यांच्या शेतीमालास मिळणारा कमी भाव यातून अनेकजण अडचणीत आले आहेत. अनेकांची कर्जे थकीत आहेत. बँका त्यांना दारातसुद्धा उभे करून घेत नाहीत. परिणामी अनेकांना नोंदणीकृत आणि सावकारांच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. परिणामी या नडलेल्या लोेकांची सावकारांकडून पिळवणूक होत आहे.

जिल्ह्यात सरकारी आणि सहकारी बँकांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. बहुतेक गावात कोणत्या ना कोणत्या एकातरी बँकेची शाखा आहे. त्याशिवाय पतसंस्थाही मोठ्या संख्येने आहेत. तरीसुद्धा जिल्ह्यातील 47 हजार लोकांना गेल्या वर्षी कर्जे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांना सावकारांकडे जाण्याची वेळ आली. या लोकांनी नोंदणीकृत सावकारांकडून 72 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. यावरून अनोंदणीकृत सावकारांकडून दिलेल्या कर्जाचा आकडा किती मोठा असेल याची कल्पना येऊ शकते.

उद्योग, व्यवसाय, शेतीसाठी अनेकांना तत्काळ पैशाची गरज असते. त्यावेळी बँकांकडून लगेच कर्ज उपलब्ध होत नाही. त्यामुळे लोकांना सावकारांकडे जावे लागते. कवठेपिरान येथील अटक केलेले तिघेही व्यावसायिक आहेत. हे तिघे संशयित 5 ते 6 वर्षांपासून सावकारी व्यवसाय करत होते. मासिक 10 टक्के व्याज घेत होते. कर्ज वसुलीसाठी दहशत व दडपशाहीचा वापर करून कर्जदारांकडून मुद्दल रक्कमेपेक्षा दुप्पटीने व्याज वसूल करून पीडितास त्रास देत होते. त्यांच्याकडून 13 लाख 55 हजार 665 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच सावकारीच्या वह्या जप्त केल्या आहेत. त्यात या सावकारांनी सुमारे 250 लोकांना कर्ज दिल्याचे पुढे आले आहे. त्यावरून त्यांची सावकारी किती जोरात आहे, हे स्पष्ट होते. या तिघांना तीन दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

वाळवा येथील डॉक्टर दाम्पत्य सावकारी करीत असल्याचे आता चव्हाट्यावर आले आहे. वैद्यकीय पदवी असतानाही आरोग्यसेवा करून पैसे मिळवण्याऐवजी सावकारी करून ते लोकांना लुबाडत असल्याचे उघड झाले आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी 753 नोंदणीकृत सावकार होते. त्यांनी सरकारचे 44 लाख 77 हजार रुपये शुल्क भरून तपासणी करून घेतली. पैकी 601 सावकारांनी 41 लाख 25 हजार रुपयांचे शुल्क भरून परवान्याचे नूतनीकरण करून घेतले आहे.

या सावकारांनी जिल्ह्यात 47 हजार 827 जणांना सुमारे 72 कोटी 16 लाखाचे कर्ज वाटप केले आहे. त्यात 215 शेतकर्‍यांना 17 लाख 11 हजार रुपयाचे कर्जवाटप केले आहे.

सावकारांना पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने सावकारी (नियमन) अध्यादेश 2014 हा सुधारित कायदा लागू केला. यातील तरतुदीनुसार सावकारी करणार्‍यास पाच वर्षापर्यंत कैद किंवा 50 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद केली. त्यामुळे अवैध सावकारीला निश्चितपणे लगाम बसेल, अशी आशा होती. मात्र ती फोल ठरल्याचे दिसत आहे. कारण गेल्या आठ वर्षात एकाही सावकाराला शिक्षा लागली नाही. कायद्याची अंमलबजावणी न झाल्याने पळवाटा शोधत सावकार मोकाट आहेत.

दरम्यान, नोंदणीकृत सावकारांच्या संदर्भात सहकार विभागाकडे गेल्या काही वर्षात 16 प्रकरणात सुनावणी होऊन अकरा प्रकरणे निकालात काढण्यात आली. त्यात केवळ दोघांना त्यांची मालमत्ता परत मिळाली. बाकी अर्जदारांचा दावा फेटाळून लावण्यात आला. त्यावरून या कायद्याची कितीपत आणि कशी अंमलबजावणी होते, हे दिसून येत आहे.

पोलिस अधीक्षक गेडाम यांनी येथे आल्यानंतर सावकारी विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी खास पथक तयार करण्यात आले आहे. तक्रार आल्यानंतर खात्री करून हे पथक सुरुवातीस संशयिताच्या घरावर धाड टाकते. सावकारी संदर्भातील कागदपत्रे जप्त करते. पुरावे मिळाल्यामुळे त्यांना शिक्षा लागण्याची शक्यता आता वाढणार आहे. आतापर्यंत तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल होत होता. तोपर्यंत संशयित पुरावे गायब करीत. तासगाव येथील महिला सावकारांकडे दोन वह्या सापडल्या. या महिलेने 70 ते 80 लोकांना व्याजाने पैसे दिल्याचे पुढे आले. आता कवठेपिरान येथील सावकारांनी तर 250 लोकांना कर्ज दिल्याचे पुढे आले आहे.

सावकार मोकाट

जिल्ह्यातील बहुतेक नोंदणीकृत आणि बेकायदा सावकारांचे राजकीय नेत्यांशी जवळचे लागेबांधे आहेत. त्यामुळे कर्ज घेतलेला पीडित तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. राजकीय मंडळीकडून कारवाई न करण्यासाठी दबाव आणला जातो. अनेकवेळा पीडितांचा वकील न्यायालयात ठोसपणे बाजू मांडत नाही. कायद्यातील पळवाट शोधत सावकार मोकाट सुटतात. याकडे देखील जाणकार लक्ष वेधत आहेत.

 वकिलांच्या सल्ल्याने सावकारी जोमात

अनेक सावकार पैसे देतानाच कोरे धनादेश घेतात. प्रति महिन्याला 10 ते 25 टक्के पर्यंत व्याजाची वसुली करतात. पैसे वेळवर परतफेड न केल्यास धनादेश बँकेत टाकून तो न वटल्यास त्याच्या विरोधातच फसवणुकीची तक्रार देतात. यामध्ये काही वकील मंडळी त्यांना सल्ला देत असल्याने ही मनमानी व्याज आकारणी करणारी सावकारी जोमात सुरू असल्याचे चित्र गडद होत
आहे.

Back to top button