सांगली : माडग्याळ मेंढीला हवे जीआय मानांकन - पुढारी

सांगली : माडग्याळ मेंढीला हवे जीआय मानांकन

माडग्याळ : वसंत सावंत : कायमचे दुष्काळाचे चटके सोसत स्थानिक पशुपालक शेतकर्‍यांनी मांस व लोकर यासाठी अत्यंत उपयुक्त अशी माडग्याळ मेंढी विकसित केली. त्याला चांगली मागणी आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील माडग्याळच्या या मेंढीला जीआय मानांकन मिळाल्यास ब्रँड म्हणून मार्केटिंग करणे सोपे जाणार आहे. याचा मेंढी उत्पादकांना चांगला फायदा होणार आहे.
ही देशी मेंढीचीच जात आहे आणि ती येथील पशुपालक व शेतकर्‍यांनी विकसित केली आहे. या मेंढीला आता मागणी वाढत असल्यामुळे तिची किंमतही वाढते आहे. त्यामुळे माडग्याळ मेंढी एक ब्रँड बनते आहे.

खिलारी जनावरांसाठी आणि माडग्याळ जातीच्या मेंढ्यांसाठी जत तालुका प्रसिद्ध आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून येथे पशुपालन केले जाते. विक्रीसाठी पशुखाद्य, खुराक घालून शेळ्या-मेंढ्यांची जोपासना करतात.

प्रतिकुल वातावरणात तग धरतात

उष्ण हवामान, अवर्षण प्रवण क्षेत्र, वारंवार उद्भवणारी चाराटंचाई अशा प्रतिकुल परिस्थितीत गाय, म्हैस व शेळ्यांच्या तुलनेत अधिक तग धरणारा मेंढी हा एकमेव प्राणी आहे. गाय, म्हैस व शेळीच्या तुलनेत कमी प्रतीचा चारा ती खाते. माळावर फिरूनही चरते. मात्र, या चार्‍याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता जास्त असते. या मेंढ्यांचे कातडे व लोकरीपासून तयार होणार्‍या वस्तूंमुळे कुटिरोद्योगालाही चालना मिळते आहे.

आर्थिक अडचणीत तातडीने उत्पन्न देणारे मेंढीपालन इतर कोणत्याही पशुपालन व्यवसायाच्या तुलनेत किफायतशीर आहे. विशेषतः, दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांसाठी ते शाश्वत उत्पन्न देऊ शकते.

माडग्याळ मेंढीची लाखात विक्री होते

माडग्याळ मेंढीची मागणी वाढू लागल्यामुळे किमतीही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे माडग्याळ आणि परिसरातील कुणीकोनूर, गुड्डापूर, व्हसपेठ, आबाचीवाडी, कुलाळवाडी अशा अनेक गावांत मोठ्या प्रमाणात माडग्याळी मेंढ्या पाळल्या जातात.अनेक पशुपालक शेतकरी या मेंढीची लाखात विक्री करीत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढले आहे.

आठवडी बाजार प्रसिद्ध

माडग्याळचा शेळ्या-मेंढ्यांचा प्रत्येक शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. तो प्रसिद्ध आहे. माडग्याळी मेंढी, शेळी आणि बोकड यांच्या खरेदीसाठी मुंबई, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटकातील व्यापारी या बाजारात येतात. कोट्यवधींची उलाढाल होते. देशातील अधिक मांस उत्पादन देणार्‍या जातींपैकी माडग्याळ ही जात प्रमुख मानली जाते.

Back to top button