एका गुणाने संधी हुकल्याने मांजर्डेच्या तरुणाची पुण्यात आत्महत्या | पुढारी

एका गुणाने संधी हुकल्याने मांजर्डेच्या तरुणाची पुण्यात आत्महत्या

तासगाव ; पुढारी वृत्तसेवा : पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या शारीरिक चाचणी परीक्षेत आलेल्या अपयशाच्या नैराश्यातून मांजर्डे (ता. तासगाव) येथील अमर रामचंद्र मोहिते (वय 34) या तरुणाने पुणे येथे आत्महत्या केली. शहरातील सदाशिव पेठ या भागात राहत्या खोलीमध्ये विष प्राशन करून अमर याने जीवनयात्रा संपवली.

अत्यंत गरीब अशा कुटुंबातील अमर याच्या वडिलांकडे केवळ 20 गुंठे शेती आहे. त्याचा सर्वात मोठा भाऊ दत्ताजीराव हा पिंपरी-चिंचवड पोलिस मुख्यालयात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. दुसरा भाऊ पंकज हा गावामध्ये मोटर मेकॅनिक म्हणून काम करतो. सर्वात लहान असलेला अमर हा 2009 पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमर याने विषारी औषध प्राशन केले असावे. सकाळी तो उशीर झाला तरी उठला नाही. त्यामुळे मित्रांनी खोलीचा

दरवाजा ठोठावला. परंतु कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी अमरच्या पोलिस दलातील भावाला माहिती दिली होती. त्यांनी याबाबत विश्रामबाग पोलिसांना कळविले.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता अमर मृतावस्थेत मिळून आला. त्याने आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणाने केली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. शनिवारी रात्री उशीरा अमरचे पार्थिव मांजर्डेत आणण्यात आले. शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमर सदाशिव पेठेत राहत होता. गेल्या दोन वर्षांपासून तो पोलिस उपनिरीक्षक पदासाठी तयारी करीत होता. पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शारीरिक क्षमता चाचणीत केवळ एक गुण कमी पडल्याने अमरची संधी हुकली. मित्रांना भेटला, त्यावेळी तो निराश दिसत होता. त्यातून त्याने आत्महत्या केली असावी, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे.

Back to top button