विलासराव जगताप : "संजयकाका हमरी तुमरीची भाषा बरी नव्हे" | पुढारी

विलासराव जगताप : "संजयकाका हमरी तुमरीची भाषा बरी नव्हे"

जत, पुढारी वृत्तसेवा

यशवंत साखर कारखान्यावरून सांगली जिल्ह्यात खासदार संजय पाटील आणि आमदार अनिल बाबर यांचा वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. या वादावर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी जत येथे एका छोटेखानी समारंभात जाहीर भाष्य व्यक्त करत संजय काकांच्या समोरच काका ही भाषा बरी नव्हे म्हणत, आमदार अनिल बाबरही तीन चार टर्म आमदार आहेत. त्यांनीही असे बोलू नये”, असा जेष्ठ सल्लावजा डोस दिला.

मागच्या काही दिवसांपासून यशवंत साखर कारखान्या वरून खासदार संजयकाका आणि आमदार अनिल बाबर यांच्या जोरदार वाद सुरू आहे. हमरी तूमरी आणि इथं तिथं येण्याची भाषा वापरली जात आहे, हा वाद प्रसार माध्यमातूनही जोरदारपणे बाहेर आला. वृत्तपत्रातील याच बातमीचा धागा पकडत माजी आमदार विलासराव जगताप यांनी खासदार संजय काकांना सल्लावजा डोस दिला.

जत शहरात माजी नगरसेवक मोहन भैया कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या सुभाष दादा अर्बन निधी बँकेच्या शुभारंभ कार्यक्रमात कार्यक्रम सोमवारी पार पडला, येथे जगताप बोलत होते. जगताप म्हणाले, राजकारणात मतभेत असावेत हे जिवंतपणाचे लक्षण आहे. काका तुमचे माझे मतभेद झाले, पण आपण मनभेद कधी केला नाही. मतभेद असणे गैर नाही पण तो वैरत्वाकडे जात असेल तर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी काय संदेश घ्यायचा?”

“आपण स्वतः दोनदा खासदार, एक वेळ आमदार व लढवय्या नेते आहात. आमदार अनिल बाबर देखील तीन चार टर्म आमदार व चांगले नेते आहेत. परंतु कारखान्याच्या वादावरून तुम्ही जी भाषा वापरत आहात, ती योग्य नाही. हे कुठेतरी थांबायला हवे. तुमचा कारखान्याचा काय वाद आहे हे आम्हाला पण माहीत नाही, पण जे प्रसारमाध्यमातून बघून घेण्याची हमरी तुमरीची भाषा समोर येत आहे ती चांगली नाही. राजकारण, समाजकारण निकोप असायला हवे”, असेही जगताप म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अजितराव घोरपडे , जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, मन्सूर खतीब, बसवराज  पाटील, सुरेशराव शिंदे, मोहन कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Back to top button