पेण : पुढारी वृत्तसेवा
बदलापूर येथे शाळेतील मुलींवरील अत्याचाराची घटना नुकतीच घडली असताना असाच प्रकार पेण तालुक्यातील एका शाळेत घडल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी २ परप्रातीय तरणांकडून छेडछाडीची घटना घडल्याने या ठिकाणी लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पेण तालुक्यातील एका गावात तीन शालेय अल्पवयीन मुलींची छेडछाड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार गावात समजताच घटनास्थळी महिला जमा झाल्या. यावेळी तिथे असणाऱ्या दोन परप्रांतीयांना गावातील महिलांनी बेदम चोप देऊन डांबून ठेवले. ही गोष्ट दादर सागरी पोलीस यांना कळल्यावर त्वरित पोलिस घटनास्थळी हजर झाले. तेथील दोन्ही परप्रांतीय संशयितांना पोलिसांनी अटक केली.
राज्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींची छेडछाड प्रकरणे सुरू समोर येत आहेत. असे असताना 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान दादर तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात फिर्यादीची मुलगी व तिच्या सोबत शाळेत शिकणाऱ्या अन्य दोन अल्पवयीन मुलींची परप्रांतीय संशयित अखिलेश शामजी सैनी (वय 20 वर्षे) व मुनुकुमार त्रिभुवन चौहान (वय 22 वर्षे) दोघेही सध्या राहणार जिते, ता. पेण व मुळ राहणार धंधरा, पो. लक्ष्मीनगर, ता. तुळशीपूर, जि. बलरामपूर- उत्तरप्रदेश यांनी त्यांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने मोबाईल व चॉकलेट दाखवून बोलावले व इशारा करून अश्लील हावभाव करत छेडछाड केली. सदर प्रकार अल्पवयीन मुलींच्या नातेवाईकांना, गावकऱ्यांना व गावातील महिलांना समजताच त्यांनी दोन्ही परप्रांतीय संशयीतांना पकडून त्यांना बेदम चोप देत डांबून ठेवले. ही घटना दादर सागरी पोलिसांना समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
सदर घटनेची नोंद दादर सागरी पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद केली आहे. उप विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशे हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.