पेण : पुढारी वृत्तसेवा
शासनाकडे सतत पाठपुरावा करूनही पूर्वीच्या मागण्या प्रलंबित असल्याने पेण तालुक्यातील आदिवासी बांधव आक्रमक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी आदिवासींच्या मागण्यांवर निर्णय न झाल्यास मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदन- द्वारे दिला आहे. (Assembly Election 2024)
पेण तालुक्यातील आदिवासींच्या विकासनिधीचा गैरवापर होत असून तालुक्यातील उंबरमाळ, खौसावाडी, काजुचीवाडी केळीचीवाडी, तांबडी, माळवाडी येथील आदिवासी वाड्यांचे रस्ते बनविणे, शाहपाडा धरणवाडीला गावठाण मंजूर करून घरकुल योजना राबविण्यात यावी यासह ग्रुप ग्रामपंचायत दुष्मि-खारपाडा आणि खरोशी ग्रामपंचायत हद्दीतील खैरासवाडी, वडमालवाडी आदिवासी वाडीला लागून असलेल्या बेकायदेशीर दगड खाणी बंद करून दोन्ही वाड्यांचे रस्ते बनविणे यासह इतर मागण्यांसाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वात उप विभागीय अधिकारी पेण यांच्या कार्यालयावर निवेदने देण्यात आली
यावेळी झालेल्या बैठकीत पेण प्रांत प्रवीण पवार, पेण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता मोहिते, पेण तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण पाटकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता रवी पाचपोर, पेण तहसीलदार सचिन शेजाळ व सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील, किशोर पाटील, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते सुनिल वाघमारे यांच्यासह ९ आदिवासी वाड्यांतील जितेंद्र वाघमारे, विशाल पवार, नर्मदा वाघे, काळया कडू, रामा खाकर, नरेश कडू, सविता पवार, महादेव शिद, रामदास पवार, धनाजी वाघे, यांचेमध्ये बैठक पार पडली.
यावेळी झालेल्या बैठकीत शिष्टमंडळाने केलेल्या मागण्यानुसार उंबरमाल, खवसावाडी येथील आदिवासी वाड्यांच्या रस्त्यांच्या विकास निधीमध्ये झालेल्या वापराची चौकशी करण्यात येईल, तांबडी येथील सभागृह खैरासवाडी वडमालवाडी, माळवाडी, काजूवाडी या वाड्यांच्या रस्ते उंबरमाळ येथील शाळा इमारत दुरुस्ती चे प्रस्ताव तात्काळ करण्यात येईल असे गटविकास अधिकारी लता मोहिते यांनी सांगितले.
तर तहसीलदार सचिन शेजाळ यांनी आदिवासींच्या प्रलंबित जातीच्या दाखल्यांचे अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील तसेच खैरासवाडी शेजारी असलेल्या दगड खाणी बाबत आदिवासींना होत असलेल्या समस्यांसाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसात प्रत्यक्ष पाहणी करण्यास पाठविले जाईल असे सांगितले. वाड्यांना भेटी देण्याचे आश्वासन संतोष ठाकूर यांनी प्रांत अधिकाऱ्यांनी जबाबदारीने खवसावाडी, काजूवाडी, उंबरमाल या आदिवासी वाड्यांना भेट देऊन तिथली परिस्थिती पहावी असे सांगितल्यानंतर निवडणुकीनंतर प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी सदर वाड्यांना भेट देण्याचे कबूल केले आहे व मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन केले आहे.