

नागोठणे : शामकांत नेरपगार
नागोठणे पोस्ट ऑफिस समोरील मन सरोज प्लाझा हौसिंग सोसायटी या इमारतीच्या खाली पार्किंगच्या जागेत उभी करून ठेवलेली मोटारसायकल चोरलेल्या साडेसोळा वर्षीय बाल गुन्हेगारा विरोधात नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अन्य मोटारसायकलच्या चोऱ्यांसह इतर छोट्या मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये या बाल गुन्हेगाराचा सहभाग असल्याची शक्यता निर्माण झाल्याने नागोठणे पोलिस यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
यासंदर्भात नागोठणे पोलिस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार नागोठणे पोस्ट ऑफिस समोरील मन सरोज प्लाझा या इमारतीत राहणारे महेश पवार यांनी आपली 51 हजार रुपये किंमतीची दुचाकी इमारतीच्या खालील पार्किंगच्या जागेत नेहमीप्रमाणे उभी करून ठेवली होती. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी ॲड. महेश पवार आपली मोटारसायकल घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांना आपली मोटारसायकल आढळून आले नाही. त्यांनी इमारतीच्या आजुबाजूला, तसेच एस. टी. बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि परिसरात दिवसभर आपल्या मोटारसायकलचा शोध घेतला असता त्यांना मोटारसायकल सापडली नाही. त्यामुळे कुणीतरी अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरल्याची खात्री झाल्याने महेश पवार यांनी नागोठणे पोलिस ठाण्यात 8 ऑक्टोबर रोजी दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद दिली.
चोरीच्या गुन्ह्याची कबुली
दरम्यान गुरुवार, 9 ऑक्टोबर रोजी नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. महेश रुईकर, पो. शि. विक्रांत बांधणकर यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून नागोठण्यातील महामार्गालगत असलेल्या रामनगर येथे जाऊन तेथील साडेसोळा वर्षीय संशयित बाल आरोपी यास नागोठणे पोलिस ठाण्यात घेऊन येण्यास त्याच्या आईला सांगितले. त्यानुसार या बाल आरोपीकडे पोलिसांनी त्याच्या आई समक्ष चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.
अल्पवयीन आरोपीने दिलेल्या माहितीनुसार चोरीला गेलेली मोटारसायकल पोलिसांनी मोटारसायकल टाकलेल्या ठिकाणी पंचनामा करून ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अन्वये बाल गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.