खालापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर कोट्यवधीची चांदी सापडली असून शुक्रवारी उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. प्राथमिक अंदाजानुसार सहा कोटींची ही चांदी असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.
खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना पिकअप मधून चांदीची मोठ्या प्रमाणात वाहतूक मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून होत असल्याची पक्की खबर मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार, खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत, सपोनि रोहिदास भोर, एस औटी, अभिजीत व्हरांबळे, पोलीस नाईक नितीन शेडगे, हेमंत कोकाटे, पोलीस हवालदार मनोज सिरतार, रतन बागुल, पोलीस शिपाई समीर पवार यांच्यासह पोलीस पथकाने शुक्रवारी पहाटे खालापूर टोल नाका येथे सापळा रचला. मिळालेल्या माहितीच्या वर्णनाची पिकअप (एम एच-०१- ईएम-८७७५) पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी सकाळी पावणेसातच्या दरम्यान खालापूर टोल नाक्यावर आली. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी पिकअप ताब्यात घेत तपासणी केली असता एक टनाच्या आसपास चांदी असल्याचे उघडकीस आले.
सदरची पिकअप खालापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आली असून पंचा समक्ष संबंधित मालाची तपासणी सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळी उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता जवळपास पाच ते सात कोटी रुपयांची चांदी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.