Diveagar road bridge safety issue : दिवेआगर मार्गावरील शेखाडी पूल कठड्याच्या प्रतीक्षेत

ग्रामस्थांनी उभारल्या काठ्या आणि साड्या; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर
Diveagar road bridge safety issue
दिवेआगर मार्गावरील शेखाडी पूल कठड्याच्या प्रतीक्षेतpudhari photo
Published on
Updated on
श्रीवर्धन : भारत चोगले

श्रीवर्धन-दिवेआगर मुख्य मार्गावरील शेखाडी ग्रामपंचायत हद्दीतील अत्यंत महत्त्वाचा पुल सध्या अपघाताच्या उंबरठ्यावर उभा आहे. काही महिन्यांपूर्वी या पुलावरील दोन्ही बाजूंचे संरक्षण कठडे कोसळले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे या गंभीर बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष सुरू आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. कठडे नसल्यानं वाहनचालकांना धोका होऊ नये म्हणून स्थानिक महिलांनी पुलाच्या दोन्ही बाजूंना लाकडी काठ्या उभ्या करून त्यावर साड्या बांधल्या आहेत, जेणेकरून वाहनचालक, विद्यार्थी, आणि पर्यटक यांना समजावे की पुढे कठडा नाही.

या अरुंद पुलावरून काही काळापूर्वी दोन मिनी डोअर आणि पर्यटकांचे वाहन घसरून खाली पडले होते. त्या वेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हा अनुभव धोक्याची घंटा ठरतो. पावसाळ्यात डोंगरावरून जोरात वाहणारे पाणी व समुद्राच्या उधाणाचे पाणी दोन्ही दिशांनी पुलाखालून वाहते, त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीस उच्च दर्जाचे सुरक्षा उपाय असणे अत्यावश्यक आहे.

शेखाडी येथे सुमारे 10 मीटर लांबीचा व 4 मीटर रुंदीचा हा सिमेंट पाईपवर आधारित पुल सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला आहे. डोंगर उतारावरून वाहणारे वेगवान पाणी, समोरच असलेला समुद्र किनारा, आणि पुलाशेजारी जिल्हा परिषद शाळा यामुळे या पुलाचे महत्त्व अधिक आहे. मात्र संरक्षण कठडा कोसळून महिन्यांनंतरही दुरुस्ती न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

शेखाडी ग्रामपंचायतचे सरपंच बबन पाटील म्हणाले, ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने नवीन पुलाची मागणी करण्यात आली आहे. सध्या तरी तात्पुरते संरक्षण कठडे उभारण्याची गरज आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. हा भाग पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असून, दिवेआगर, श्रीवर्धनमार्गे येणार्‍या हजारो पर्यटकांसाठीही हा मार्ग महत्त्वाचा आहे.

अशा मार्गावर संरक्षण कठड्याशिवाय पुल चालू ठेवणे म्हणजे अपघातांना आमंत्रण देण्यासारखेच आहे. ग्रामस्थांनी स्वतःहून घेतलेली जबाबदारी कौतुकास्पद असली तरी, यंत्रणेचा हलगर्जीपणा मात्र धोकादायक आहे.

प्रशासनाकडे मागणी

  • तात्काळ तात्पुरते संरक्षण कठडे उभारावेत

  • नवीन व सुरक्षित पुलासाठी निधीची तरतूद करावी

  • जिल्हा प्रशासनाने स्वतः भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा

सध्याच्या परिस्थितीत शेखाडी येथील पुलाच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तत्पूर्वी अपघात टाळण्यासाठी संरक्षणात्मक उपायांवर भर दिला जात आहे. यासोबतच नवीन व अधिक सुरक्षित पुलाच्या बांधकामासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र प्रस्ताव समाविष्ट करण्यात आलेला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ पुढील कार्यवाही हाती घेण्यात येईल. सार्वजनिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ही बाब गांभीर्याने घेतली जात आहे.

तुषार लुंगे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, श्रीवर्धन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news