

पाली : शरद निकुंभ
प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात कच-याची समस्या गंभीर झाली आहे. नगरपंचायत मार्फत शहरांमध्ये घंटागाड्या फिरून देखील काही नागरिक भर वस्तीत रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. परिणामी घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालीतील कचरा समस्येवर मात करण्यासाठी काही वर्षांपूर्वी घंटा गाड्या सुरू करण्यात आल्या. सध्या पुरेशा 5 घंटागाड्या कार्यरत आहेत. या घंटागाड्या येथील विविध भागात दररोज निश्चित वेळेत फिरून कचरा गोळा करतात. आठवड्यातून एकही दिवस सुट्टी घेतली जात नाही. अगदी दिवाळीत देखील घंटागाडी नियमित येत होती. मात्र तरीही अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग पडलेले असतात.
प्रमुख्याने बल्लाळेश्वर नगरकडे जाणारा मार्ग, जिल्हा परिषद शाळा, आदिवासी समाज भवन शेजारी व त्यापुढे, मधली आळी, राम आळी जुने पोलीस स्थानक, आगर आळी, भाग्यश्री प्लाझा आदी ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्यात येतो. घंटागाडी कचरा घेऊन गेल्यानंतर झालेला कचरा काही दुकानदार आणि अनेक नागरिक घरात किंवा सोयटीमध्ये साठवून न ठेवता लागलीच रस्त्यावर टाकतात. तर काहीजण दिवसभर घरी नसल्यास जमा झालेला कचरा रस्त्याच्या कडेला टाकून देतात.
परिणामी कचऱ्याची समस्या जैसे थेच राहते. यामुळे नागरिकांसह भाविकांचे आरोग्य देखिल धोक्यात आले आहे. भटके कुत्रे व जनावरे हा कचरा अस्ताव्यस्त करतात. तसेच गुरे-ढोरे व भटके कुत्रे यातून अन्न शोधण्यासाठी जातात आणि हा सर्व कचरा व घाण रस्त्यावर व बाजुच्या गटारात पडते. आणि गटारे तुंबून आणखी समस्या उद्भवते.
जनावरांच्या पोटात जातेय प्लास्टिक
घातक कचरा रस्त्याच्या कडेला टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामध्ये दारूच्या व बियरच्या बाटल्या तसेच घरगुती सामान देखील टाकण्यात येते. या फुटलेल्या दारूच्या बाटल्या जनावरे, कुत्रे तसेच माणसांच्या पायाला लागून इजा होण्याची शक्यता आहे. या उकिरड्यावर गुरेढोरे व कुत्रे कायम असतात. त्यांच्या पोटामध्ये येथील घातक पदार्थ आणि प्लास्टिक देखील जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो.
मेहनती सफाई कर्मचारी पाली नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी मेहनत घेऊन आपली जबाबदारी पूर्ण करतात. मात्र रस्त्याच्या कडेला साठलेला कचरा काढतांना त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येतो. परिणामी सर्वच ठिकाणची साफसफाई वारंवार करणे त्यांना शक्य होत नाही. तरीदेखील या ठिकाणची साफसफाई ते नियमित करतात. मात्र पुन्हा या ठिकाणी नागरिक रोज कचरा लागतात.
गटारे व नाले तुंबतात सध्या पावसाळा अजून सुरूच आहे परिणामी रस्त्याच्या कडेला टाकलेला कचरा प्लास्टिकच्या बॉटल व प्लास्टिक पिशव्या आदी आजूबाजूच्या गटारे व नाल्यांमध्ये जातात. त्यामुळे या ठिकाणी गटार व नाले तुंबतात आणि दुर्गंधी व रोगराई पसरते. तसेच सफाई कामगारांचे काम देखील वाढते.
पाली नगरपंचायतीने स्वच्छ भारत अभियानअंतर्गत पाली शहर कचराकुंड्या मुक्त केले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आपला कचरा हा येणाऱ्या घंटा गाडीतच टाकावा. जेणेकरून आपले शहर स्वच्छ व सुंदर राहील. हटविण्यात आलेल्या कचराकुंडीच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही कोणी कचरा टाकताना आढळल्यास घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार दंडात्मक कारवाई देखील करत आहोत. या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच वारंवार सूचना देखील देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी शिस्त पाळण्याची गरज आहे.
माधुरी मडके, मुख्याधिकारी, पाली नगरपंचायत