

खोपोली ( रायगड ) : आगामी जिल्हा परिषद पंचयत समिती सह नगरपालिकेचे निवडणुका तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी नवनियुक्त्या यासह वेगवेगळे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असली तरी इच्छुक उमेदवार आरक्षण काय पडणार यावेळी डोळे लावून बसले आहेत मात्र जनसंपर्क आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीगाठी वर सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यानी भर देऊन आपली व पक्षाची भूमिका सांगण्यात उमेदवार व कार्यकर्ते मग्न आहेत.
मागील राजकीय परिस्थिती जिल्हा परिषद मतदार संघात चार पैकी तीन राष्ट्रवादी तर एक शिवसेना पंचायत समिती, चार राष्ट्रवादी तर तीन शिवसेना एक शेकापकडे संख्याबळ आहे. मात्र सध्या भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे आगामी काळात कोणाची कोणाला साथ मिळणार यावर वर्चस्व अवलंबून आहे मात्र राष्ट्रवादी ला रोखण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने रणनीती आखली असल्याचे चित्र आहे.
कर्जत- खालापूर मतदार संघात महाविकास आघाडी व महायुती असे दोन गट पडले असले तरी दोन्ही बाजूने आघाड्यांची बिघाडी झाल्याचे चित्र असून कर्जत खालाप रात तर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीमध्ये असताना आमनेसामने कट्टर विरोधी भूमिकेमध्ये आहेत मात्र भाजपा, शेकाप व काँग्रेस, आरपीआय मात्र तटस्थ भूमिकेत आहे. त्यामुळे खालापूर तालुक्यात प्रमुख भूमिकेत असणाऱ्या राष्ट्रवादी व शिवसेना काही झाले तरी विरोधी भूमीकेतूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहे यात मात्र शंका नाही मात्र या दोघांना ही विजयापर्यंत पोहचविणारे मित्र पक्ष भाजपा व आरपीआय शेकाप, काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहेत. खालापूर तालुक्यात प्रमुख भूमिकेमध्ये असणारे शिव सेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांची ग्रामीण भागात परिस्थिती दोन्ही बाजूने तुल्यबळ आहे.
मात्र विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून आमदार झालेले महेंद्र थोरवे यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी अपक्ष निवडणूक लढवून मागे ठेवण्यात घारे यांनी यश मिळविले असले तरी विधानसभा निवडणुकी नंतर खालापूर तालुक्यात शिंदे गटाने पूर्णता पक्ष बळकट करण्यासाठी लक्ष केंद्रीत केले आहे. असे असले तरी गावगावत भाजप किंवा महायुतीमध्ये असणारे भाजपचे कार्यकर्ते वेगवेगळ्या भूमिकेत कोण शिंदे गटाच्या तर कोण राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला असल्याचे चित्र आहे त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचयत समितीवर कोणाचे वर्चस्व असणारे याकडे निवडणुकीतील कलच ठरविणार आहे.
खालापुरात चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीच्या जागा आहेत. सध्या राष्ट्रवादी तीन जिल्हा परिषद व दोन पंचायत समिती तर शिवसेनेचा एक जिल्हा परिषद व तीन पंचयत समिती तसेच दोन शेकाप व काँग्रेस एक अशी स्थिती आहे, मात्र शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी एक व शिवसेना एक असे दोन जिल्हा परिषद सदस्य भाजपमध्ये गेले तर राष्ट्रवादीचे माजी उपसभापती शिवसेना शिंदे गटात गेल्याने यानंतर आगामी निवडणुकीत वेगळी परिस्थिती असेल असे दिसते.
खालापूर तालुक्यात चार मतदारसंघात साजगांव मतदार संघातून नरेश पाटील, वडगांव जिल्हा परिषद मतदार संघात पदमा पाटील तर वांसाबे उमा मुंढे तसेच चौक मतदारसंघातून मोतीराम ठोंबरे तर पंचायत समितीच्या आठ पैकी सांजगाव मतदारसंघात श्रद्धा साखरे तर खरीवली मतदारसंघात उत्तम परबलकर, वडगांवमध्ये शेकापचे कातकरी तर कुंभिवलीत विश्वनाथ पाटील, चौकमध्ये कमळ भस्मा व अक्षय पिंगळे तर वांसाबेत पंचयत समिती सदस्या कांचन पारंगे व वृषाली पाटील यांना संधी मिळाली होती.