पेण : खाजगी मिटींगसाठी रायगडात आलेले नवी मुंबईतील दोन रिअल इस्टेट एजंट बेपत्ता झाले होते. त्यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याने गाडीमध्ये रक्ताचे डाग आणि दोन बंदुकीच्या गोळ्यादेखील सापडल्या होत्या. त्यांचा शोध घेतला असता शुक्रवारी (दि.२३) पेण-खोपोली रोडवरील गागोदे गावाच्या हद्दीतील रस्त्यावर सुमित जैन या एका एजंटचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. परंतू दुसरा एजंट अजूनही बेपत्ता असल्याने त्या एजंटचे नेमके काय झाले असेल? याबाबतही संशय व्यक्त होत आहे.
नवी मुंबईतील नेरुळ येथे राहणारे सुमित जैन व अमीर खानजादा हे दोघे रिअल इस्टेटचे काम करतात. एका खाजगी मीटींगसाठी दोघेही कारने रायगडला आले होते. रात्री बराच उशिर झाल्याने घरच्यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांचेही मोबाईल बंद असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे कुटुंबाची चिंता वाढली होती. त्यांनी नेरुळ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. त्यांच्या कारला जीपीएस सुविधा असल्याने जीपीएसवरून कारचा मागोवा घेत ते मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन पाली फाटा एक्झिटच्या बाजूला, कॅफे सागर हॉटेलकडे जाणार्या मार्गावर आले असता त्यांना तिथे त्यांची गोळीबार झालेली कार सापडली. मात्र दोघेही कारमधील दोघेही गायब होते.
शुक्रवारी (दि.२३) सुमित जैन याचा मृतदेह पेण-खोपोली रोडवरील गागोदे गावाच्या हद्दीत रस्त्यावर सापडला. मात्र त्यांच्याबरोबर असणारा त्यांचा सहकारी समीर खानजादा यांचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. घटनास्थळी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.