नाते : इलियास ढोकले
71 वर्षानंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात सोमवार पासून होत आहे. याचे औचित्य साधत महाडचे आमदार भरत गोगावले यांनी आज किल्ले रायगडावरील श्री जगदीश्वराला अभिषेक करून ते नतमस्तक झाले.
यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण श्री जगदीश्वराला व छत्रपतींना राज्यात पुन्हा महायुतीचे शासन यावे असे साकडे घातल्याचे सांगितले. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी आज श्रवणाच्या पहिल्याच सोमवारी किल्ले रायगडावर जाऊन महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. या निमित्ताने किल्ले रायगडावरील जगदिश्वर मंदिर, शिरकाई देवी, तसेच शिवसमाधी स्थळाचे विधीवत पुजन करण्यात आले.
यावेळी आ. गोगावले यांच्या सोबत राष्ट्रवादीचे माजी आ. अनिकेत तटकरे उपस्थित होते. यावेळी महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येऊ दे, रायगडसह महाराष्ट्रातील महायुतीचे सर्व उमेदार निवडून येऊ दे, अतिवृष्टी थांबून, शेतकऱ्यांसाठी चांगला पाऊस पडू दे असे साकडे आ. गोगावले यांनी जगदीश्वराला घातले. महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपण रायगड किल्ल्यावरून करीत असल्याचे आ. गोगावले यांनी जाहिर केले.