

रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मेंदडी कोंड गावात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका वृद्ध दांपत्याचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याचे समोर आले असून, या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी (दिनांक 1 नोव्हेंबर 2025) सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. बंद घरातून तीव्र कुबट वास येत असल्याची माहिती गावातील नागरिकांनी तत्काळ म्हसळा पोलिसांना दिली, ज्यामुळे या घटनेची नोंद झाली.
माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घराचे दार उघडले असता, त्यांना महादेव बाळ्या कांबळे (वय 95वर्षे) आणि त्यांची पत्नी विठाबाई महादेव कांबळे (वय 83 वर्षे) हे दोघेही मृत अवस्थेत आढळले.
प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने, त्यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाची स्थिती पाहता, यात घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे, ज्यामुळे घटनेचे गांभीर्य वाढले आहे.
या संशयास्पद घटनेमुळे, म्हसळा पोलिसांनी पुढील चौकशीसाठी फॉरेन्सिक पथक, श्वानपथक आणि गुन्हे शाखा अलिबाग, रायगड पोलिसांच्या पथकांना तात्काळ घटनास्थळी बोलावले. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी या दोघांचे मृतदेह अधिक तपासणीकरिता मुंबई येथील इस्पितळात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच रायगडचे पोलिस उपअधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात भेट देऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली.
सध्या म्हसळा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या नेतृत्वाखाली अधिक तपास सुरू आहे.
गावातील नागरिक आणि नातेवाईक यांच्याकडून सखोल माहिती घेऊन पोलीस हत्या की आत्महत्या या दिशेने तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या वृद्ध दांपत्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि या धक्कादायक घटनेमागील रहस्य उलगडेल.